Breaking News

राष्ट्रवादीने दिली होती विरोधी पक्षनेत्याची आॕफरः एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

जळगाव
भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदाची ऑफर होती, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. शिवाय, राष्ट्रवादीचे नेते एबी फॉर्म घेऊन उमेदवारीसाठी घरी आल्याचा खुलासाही खडसेंनी केला. भुसावळ येथे भाजप उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. आपल्यावर अन्याय झाला हे खरं आहे, त्यासाठी माझा गुन्हा काय हे मी पक्षाला विचारणा करणार असल्याचंही खडसे म्हणाले. पण ज्या पक्षाने मला मंत्री बनवलं, विरोधी पक्षनेता बनवलं, संपूर्ण महाराष्ट्राला माझी ओळख दिली, त्या पक्षाला मी सोडून जाणं हे माझ्या मनाला न पटणार होत असं सांगताना एकनाथ खडसे म्हणाले.
मुक्ताईनगर येथे भाजपने एकनाथराव खडसे यांचे तिकीट कापून त्यांच्या कन्या रोहिणी खडसे याना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने आपल्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावत, सेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील याना आपला पाठिंबा दर्शविला आहे. एखाद्या राष्ट्रीय पक्षाला आपला उमेदवार माघारी घ्यावा लागून एका अपक्षाला पाठिंबा द्यावा लागतो यावरुन मुक्ताई नगरमध्ये  राष्ट्रवादी पक्षाची किती दयनीय अवस्था झाली आहे, हे यावरुन लक्षात येत असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्या मुलीच्या उमेदवारी विरोधात उभ्या असलेल्या अपक्ष बंडखोर उमेदवारास शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने पाठिंबा द्यावा अशा नेत्याला राष्ट्रीय नेता म्हणावे का?, असा सवाल करीत खडसे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.