Breaking News

पुण्यातील कसोटी सामन्यावर संकट; दोन्ही संघांना बसू शकतो मोठा फटका!

पुणे/प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 203 धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या दोन्ही संघादरम्यानचा दुसरा कसोटी सामना पुण्यात होणार आहे. पण दुसर्‍या कसोटी सामन्याआधी एक वाईट बातमी हाती आली आहे. पुण्यात होणारा दुसरा कसोटी सामना 10 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ पुण्यात दाखल झाले आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दोन्ही संघ स्वत:चे स्थान बळकट करण्याच्या हेतूने दुसर्‍या कसोटी सामन्यात मैदानात उतरतील. पण पुण्यात या दोन्ही संघांसमोर एकमेकांचे नव्हे तर हवामानाविरुद्ध लढण्याचे आव्हान असणार आहे. येत्या काही दिवसात पुण्यात खराब हवामान असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना होणार का याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने पुण्यात वादळाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळेच सामना वेळेत सुरु झाला तर सर्वांसाठी आश्‍चर्यच असेल. मैदान व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार पाऊस थांबल्यानंतर 15 ते 20 मिनिटात सामना पुन्हा सुरु होऊ शकतो. पण हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुण्यात दिवसभर पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसामुळे कसोटी रद्द झाली तर दोन्ही संघांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने मोठा फटका बसू शकतो.
पुण्यातील सामना जर ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 13 गुण मिळतील. एखाद्या संघाने सामना जिंकला तर त्या संघाला 40 गुण मिळतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे नियमच असे करण्यात आले आहेत की प्रत्येक सामना हा महत्त्वाचा ठरतो. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात स्वच्छ वातावरण आहे. पण येत्या काळात पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. अर्थात पावसामुळे सामना झाला नाही तर भारतीय संघाचे फार मोठे नुकसान होणार नाही. असे असले तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा ठरतो. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुण तक्त्यात भारतीय संघ 160 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंड 60 गुणांसह दुसर्‍या तर श्रीलंका तितक्याच गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया चौथ्या आणि इंग्लंड पाचव्या क्रमांकावर आहे.
कसोटी मालिका दोन सामन्याची असेल तर पहिल्या सामन्यातील विजयासाठी 60 गुण दिले जातात.