Breaking News

बालिकाश्रम रस्त्यावरील परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात

अहमदनगर /प्रतिनिधी
शहरात महापालिका अस्तित्वात आल्यानंतर बालिकाश्रम रस्त्यावर जास्तीत जास्त राजकारण झाल्यानंतर तसेच बैलगाडीचा रस्ता म्हणून हिणावल्या गेलेल्या बालिकाश्रम रस्त्याचे रुप पालटले असले तरी हा रस्ता पूर्णत: अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. या रस्त्याला अनेक दृष्टीने महत्व प्राप्त झाले आहे.
बालिकाश्रम रस्ता हा अनेक दृष्टीने मोठमोठ्या वाहनांसाठी जवळचा मार्ग म्हणून वापर करण्यात आला आहे. धुळे, मनमाड आदी ठिकाणांहून तसेच एमआयडीसीवरुन निघणारी अवजड वाहने पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग म्हणून सावेडीतील परिचय हॉटेल जवळून भूतकरवाडी, नीलक्रांती चौक, बागरोजा हडको, आयुर्वेद कॉलेज, सक्कर चौक या मार्गे पुण्याकडे जातात. परंतु अशा अवजड वाहनांमुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते.
हा रस्ता अत्यंत गजबजलेला असून या संपूर्ण रस्त्यावर लहान मोठी दुकाने, चहा, कॉफीचे स्टॉल्स, पान टपर्‍या, विविध अल्पोपहाराची दुकाने, विविध प्रकारची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे वर्ग, फूटपाथवर असलेली दुकाने, विविध हॉटेल्स यामुळेच हा रस्ता अत्यंत वर्दळीचा बनला आहे. तसेच या रस्त्यावर असणारी दुकाने रस्त्याच्या दिशेने अत्यंत पुढे आलेली असून या दुकानांमुळे सर्व पादचारी पथ व्यापला आहे. त्यामुळे दुकानांच्या पुढे रस्त्यांवरच फ्लेक्सचे बोर्ड, दुकानातील वस्तू दर्शविणारे फलक, विविध स्पर्धा परीक्षा तसेच महाविद्यालयात येणार्‍या विद्यार्थ्यांच्या वाहनांचे पार्किंग या रस्त्यावरच असल्याचे दिसून येते. तसेच रस्त्यातच विविध प्रकारच्या चारचाकी वाहने अनेक महिन्यांपासून धूळखात अवस्थेत पडून आहेत. आजबाजूला विविध हॉस्पिटल्स तसेच हॉटेल्स असल्याने या सर्वांचीच पार्किंग व्यवस्था रस्त्यावरच असते.
नीलक्रांती चौक ते सावेडीतील हॉटेल परिचय दरम्यान असलेल्या भूतकरवाडीतील महालक्ष्मी उद्यान परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली असून चौकातच विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, दुकाने, हॉटेल्स, रिक्षा थांबा आदींमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. संध्याकाळी उद्यान सुरू झाल्यानंतर मात्र या भागात मोठी गर्दी होते. अशावेळी मनमाड रोडवरुन येणार्‍या अवजड वाहन अथवा चारचाकी वाहनांमुळे या भागातील होणारी वाहतुकीची कोंडी न सुटणारी असते.
नीलक्रांती चौक हा अनेक दृष्टीने महत्वपूर्ण बनला असून हा भाग मध्यवर्ती भागात येत असतो. या भागात दिल्लीगेट परिसरातून येणारी वाहने,  आयुर्वेद महाविद्यालय रस्त्याने मनमाड रोडच्या दिशेने जाणारी वाहने, सर्जेपुराच्या दिशेकडून येणारी वाहने, सक्कर चौक, आयुर्वेद महाविद्यालय या मार्गाने बागरोजा हडकोमार्गे येणारी वाहने आदी वाहतूक नीलक्रांती चौकातूनच होते. त्यामुळे या भागात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एखाद्या सक्षम वाहतूक पोलिसाच्या नेमणुकीची आवश्यकता आहे. परंतु अद्यापही अशा कोणत्याही पोलिसाची येथे नियुक्ती नसल्याने येथील वाहतूक कोंडी नित्याचीच बाब होऊन बसली आहे.