Breaking News

रोहितचा धमाका अश्‍विनची कमाल दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

विशाखापट्टणम/वृत्तसंस्था
रोहित शर्माच्या दोन शतकानंतर अश्‍विन, जडेजा आणि मोहम्मद शमी यांच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने तिसर्‍या कसोटीत 203 धावांनी विजय मिळवला. पाचव्या दिवशी 1 बाद 11 वरून पुढे खेळण्यास सुरुवात झालेल्या दक्षिण आफ्रिकेला रविंद्र जडेजाने दुसरा दणका दिला. त्यानंतर अश्‍विनने ब्रायनला बाद केलं. त्यानंतर शमीने तीन गडी बाद केले. शमीनंतर जडेजाने एकाच षटकात तिघांना बाद करून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. आफ्रिकेच्या फलंदाजांनी दोन विकेटसाठी भारताच्या गोलंदाजांची दमछाक केली. 8 बाद 70 वरून शेवटच्या तीन फलंदाजांनी 121 धावांची भर घातली. यासाठी त्यांनी 37 षटके खेळून काढली. शेवटी दोन्ही गडी बाद करून शमीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आफ्रिकेचा दुसरा डाव 191 धावांवर संपुष्टात आला.
तत्पूर्वी भारताने पहिल्या डावात 7 बाद 502 धावा केल्या होत्या. तर दक्षिण आफ्रिकेला 431 धावांत रोखलं होतं. त्यानंतर भारताने चौथ्या दिवशी दुसरा डाव 323 धावांवर घोषित करून आफ्रिकेला 395 धावांचं आव्हान दिलं. शेवटच्या सत्रात आफ्रिकेचा एक गडी बाद झाला होता.
पहिल्या डावाता भारताला धमाकेदार सुरूवात करून देणार्‍या रोहित आणि मयंकला दुसर्‍या डावात मात्र मोठी भागिदारी करता आली नाही. मयंक केवळ 7 धावा करत माघारी परतला. त्यानंतर रोहितनं शतकी खेळी केली. रोहित आणि चेतेश्‍वर पुजारा यांनी शतकी भागिदारी केल्यानंतर पुजारा 81 धावांवर बाद झाला. त्यानंतर जडेजानं 40 धावांची आक्रमक खेळी केली. तर विराटनं नाबाद 31 आणि रहाणेनं नाबाद 27 धावांची खेळी केली.

रोहितचा धमाका
रोहित शर्मा एका कसोटी सामन्यात 9 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठोकला आहे. रोहितने पहिल्या डावात शतकी खेळी करताना 6 षटकार ठोकले होते. दुसर्‍या डावात 4 षटकार खेचले आहेत. यासह रोहितने सिद्धू यांच्या नावावर असलेला विक्रम मोडला. सिद्धू यांनी 1994मध्ये लखनौ कसोटीत श्रीलंकेविरुद्ध 8 षटकार ठोकले होते. याचसोबत कसोटी, टी-20 आणि वन-डे अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावे जमा झाला आहे.

अश्‍विनची कमाल
अश्‍विनसाठी ही कसोटी खास ठरली. त्याने शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. दहा महिन्यांनी कसोटीत उतरताना त्यानं कमाल केली. कसोटीमध्ये अश्‍विनने आतापर्यंत 27 वेळा एका डावात पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचव्यांदा त्याने पाच विकेट घेतल्या आहेत. त्याने हरभजन सिंग आणि जवागल श्रीनाथ यांना मागे टाकलं आहे. या दोघांनीही आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी चार वेळा पाच गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे.