Breaking News

स्पर्धा परिक्षेतील यश मनोबल उंचावणारे : संचित जाधव

पिंपळनेर/प्रतिनिधी
ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आत्मविश्‍वासाने स्पर्धा परीक्षेत उतरणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठे ध्येय, स्वक्षमतेचे आकलन, अभ्यासाचे सातत्य आणि योग्य दिशेचे भान ठेवले तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यश अटळ आहे. एका परीक्षेतील यश तुमच्या करिअरला स्थर्य देण्यात व तुमचे मनोबल उंचावण्यास कारणीभूत ठरू शकते, असे प्रतिपादन संचित जाधव यांनी केले आहे.
मुलिकादेवी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने यूपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्या संचित जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सहदेव आहेर होते.
संचित जाधव यांची नुकत्याच घोषित झालेल्या यूपीएससीच्या निकालात असिस्टंट कमांडर या रँकसाठी निवड झाली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेतील शालेय शिक्षणापासून शिक्षणाला सुरुवात केलेल्या जाधव यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवून उत्तम पगाराची नोकरी आत्मविश्‍वासाच्या जोरावर नाकारून यूपीएससीचा अभ्यास करून उच्च ध्येय मेहनत व सातत्याच्या जोरावर यश संपादन केले. यावेळी महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन स्पर्धा परिक्षा समन्वयक प्रा.आनंद पाटेकर, प्रा अशोक कवडे, प्रा.सोनाली बेलोटे यांनी केले.
यावेळी प्राचार्य डॉ.सहदेव आहेर म्हणाले की, मुलिकादेवी महाविद्यालयातील विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असल्याने स्पर्धा परीक्षेचे व्यवस्थित आणि पूर्ण आकलन व्हावे, म्हणून महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन मिळावे या हेतूने संचित जाधव यांच्यासारखे यशवंत सातत्याने निमंत्रित केले जातात. त्याचा महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा असे आव्हान केले.
यावेळी संचित जाधव यांचे वडील प्रा.जाधव, प्रा.किरण पाडळकर, प्रा.गिरीष कुकरेजा, प्रा.के.बी. शिंदे, प्रा.जासूद, सरपंच ठकाराम लंके, उपप्राचार्य डॉ.मनोहर एरंडे, डॉ.गोविंद देशमुख, प्रा.शामराव रोकडे, कार्यालयीन अधिक्षक नवनाथ घोगरे, प्रा.मनिषा गाडिलकर, प्रा.सचिन लंके, प्रा.विशाल रोकडे, प्रा.प्रविण जाधव तसेच प्रा.जनाबाई घेमुड, प्रा.केशर झावरे, प्रा.अंजली मेहेर, दिगेश पवार, प्रा.अक्षय अडसुळ, प्रा. सुरेश रासकर, प्रा.दिपाली जगदाळे उपस्थित होते.