Breaking News

दहशतवाद्यानं सुरक्षामंत्र्याला भोसकलं, घटना कॅमेर्‍यात कैद

Wiranto
जकार्ता
इंडोनेशियाचे मुख्य सुरक्षामंत्री विरान्तो आपल्या गाडीतून उतरताच आयसिसच्या कट्टर दहशतवाद्याने त्यांना भोसकल्याची घटना गुरुवारी घडली. या हल्ल्यात विरान्तो यांच्या पोटावर दोन खोल जखमा झाल्या आहेत तर अन्य तीन जणही हल्ल्यात जखमी झाले आहेत, असे अधिकार्‍यांनी सांगितले. विरान्तो गाडीतून उतरताच एक जण त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना भोसकले, असे पोलिसांचे प्रवक्ते देदी प्रासेत्यो यांना सांगितले. जावातील पांडेगलांग विद्यापीठाबाहेर एक महिला आणि एका पुरुषाने हा हल्ला केला. या हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.

विरान्तो यांच्या पोटात दोन खोल जखमा झाल्या असून त्यावर कदाचित शस्त्रक्रिया करावी लागेल, असे असले तरी मंत्र्यांची प्रकृती स्थिर आहे, असे बरकाह रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. विरान्तो यांना हेलिकॉप्टरने जाकार्ता येथे नेण्यात आले आहे. स्थानिक पोलीस प्रमुख आणि त्यांचे दोन सहकारी असे अन्य तीन जण हल्ल्यात जखमी झाले आहेत.