Breaking News

सुनील वलटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कोपरगाव/ता.प्रतिनिधी
शहीद सुभेदार सुनील रावसाहेब वलटे यांच्यावर दहेगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यविधीला तालुक्यातून जनसागर लोटला होता. भारत माता की जय, वंदे मातरम, सुनील वलटे अमर रहेच्या जयघोषांनी आसमंत दणाणून निघत असताना नातेवाईक व उपस्थित गावकर्‍यांनाही शोक आवरता येत नव्हता. काश्मीर मधील नवशेरा सेक्टरमध्ये झालेल्या अतिरेकी कारवाईत नायब सुभेदार सुनील वलटे यांना गोळी लागल्याने ते शहीद झाले.
शहीद सुनील वलटे यांचे पार्थीव गुरुवार (दि.24) रोजी सकाळी नऊ वाजता दहेगाव गावात आणण्यात आले. अंत्यदर्शनासाठी शहीद सुनील वलटे याचे पार्थीव येथील गणेश मंदिर प्रांगणात ठेवण्यात आले होते.
यावेळी प्रशासनाच्यावतीने निवासी जिल्हाधिकारी प्रशांत पाटील, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सैनिक कल्याण अधिकारी सुभेदार अब्दुल माजीद शेख, स्नेहलता कोल्हे, शांतीलाल होन, मारूती कोपरे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी लष्कर व पोलिसांच्यावतीने शहीद जवान सुनील वलटे यास सलामी देण्यात आली. शहीद जवान सुनील वलटे यांचा भाऊ अनिल वलटे यांनी मुखाग्नी दिला. यावेळी परीसरातील जवळपास तीस ते पस्तीस हजार नागरिक उपस्थित होते.