Breaking News

गुजरातमध्ये अचानक कोसळला पूल मधोमध लटकल्या कार

जुनागड
गुजरातमध्ये 40 वर्षे जूना व 60 फूट लांबीचा एक पूल पावसामुळे अचानक कोसळल्याचा प्रकार समोर आला आहे. जुनागड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हा पूल अगदी मधोमध खचला. यामध्ये जिवीतहानी झाल्याची माहिती अद्याप नाही. मात्र, पूलावरुन जाणार्‍या तीन ते चार गाड्या नदीमध्ये वाहून जाण्यापासून अगदी थोडक्यात बचावल्या. काही गाड्या पुलावरच मधोमध लटकल्या होत्या. रविवारी पूल तुटण्याची ही घटना घडली. सासन आणि गीर या भागाला जोडणारा हा पूल आहे. पूल कोसळल्यामुळे सासन आणि गीर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पूल कोसळल्याची माहिती समजताच परिसरातील लोकांनी एकच धाव घेत मदकार्य सुरू केलं. या दुर्घटनेत जिवीतहानी झाली नसून, काही जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती जुनागडचे जिल्हाधिकारी सौरभ पारधी यांनी दिली.