Breaking News

गोळीबार प्रकरणातील आरोपीला शिवसेनेने दिली उमेदवारी

Shivsena
बहादुरगड:
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिदच्या हत्येचा प्रयत्न करणार्‍याचा आरोप असलेल्या नवीन दलाल याला शिवसेनेने निवडणुकीचे तिकीट दिले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणामध्येही विधानसभा निवडणुका होणार असून या निवडणुकीमध्ये शिवसेनेने खालिदवर गोळीबार करण्याचा आरोप असणार्‍या नवीनला तिकीट दिले आहे. येथील बहादुरगड मतदारसंघातून नवीन शिवसेनेच्या धुनष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.

‘मी सहा महिन्यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवाद आणि गौ संरक्षण हे माझे धोरण आहे,’ असं स्वत:ला गौरक्षक म्हणावणारा नवीन सांगतो. ‘राष्ट्रवाद, गाईंचे संरक्षण आणि आपल्या क्रांतीकारांना ओळख मिळवून देण्यासाठी आमची लढाई आहे,’ असं नवीनने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले. भाजपा आणि काँग्रेस सरकारला शेतकर्‍यांचे प्रश्‍न, शहीदांचे प्रश्‍न, गाई आणि गोरगरिबांबद्दल कोणताही आस्था नसून त्यांना केवळ राजकारण करायचे आहे अशी टीका नवीनने केली आहे. नवीनला तिकीट देण्यात आल्याच्या वृत्तावर हरिणायातील दक्षिण विभागाचे शिवसेनेचे प्रमुख विक्रम यादव यांनी शिक्कामोर्तब केले आहे. ‘नवीन गौ संरक्षण, देशविरोधी घोषणाबाजी करणार्‍यांविरोधात आवाज उठवण्याचे काम करत आहे, म्हणून आम्ही त्याची निवड केली आहे,’ असं यादव सांगतात.

13 ऑगस्ट 2018 रोजी दर्वेश सापूर आणि नवीन दलाल या दोघांनी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब येथे उमर खालिदवर गोळीबार केला होता. गोळीबार केल्यानंतर हे दोघे घटनास्थळावरुन पळून गेले होते. संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये खालिदवर या दोघांनी गावठी पिस्तुलने उमरवर दोन गोळ्या झाडल्या. मात्र सुदैवाने खालिदने तेथून पळ काढल्याने तो बचावला. खालिदवर गोळीबार करुन पळणारा नवीन हा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला.

पोलिसांनी अटक करण्याआधीच या दोघांनी सोशल मिडियावर आपला एक व्हिडीओ पोस्ट केला होता. इंकलाब जिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय, अशा घोषणा त्यांनी व्हिडिओत दिल्या होत्या. ‘आम्ही सुप्रीम कोर्ट आणि संविधानाचा आदर करतो. पण जेएनयूतील या टोळीचा खात्मा करण्याची गरज आहे. आमच्या पूर्वजांनी सांगितले होते की पिसाळलेल्या कुत्र्यांना ठार मारले पाहिजे. उमर खालिदवरील हल्ला ही स्वातंत्र्य दिनी देशवासियांना दिलेली भेट होती. आम्ही 17 ऑगस्ट रोजी पोलिसांना शरण जाऊ,’ असं या दोघांनी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. दिल्ली पोलिसांच्या 30 जणांच्या पथकाने लुधियानामधून या दोघांना 19 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले होते.

खालिदवर हल्ला केल्याच्या प्रकरणात सध्या नवीन हा जामीनावर बाहेर असून त्याला शिवसेनेने निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.