Breaking News

पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने दाखल केला माहिती अहवाल

पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरवर आधारित आपला माहिती अहवाल दाखल केला आहे. यापूर्वी पोलिसांनी याप्रकरणी हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या (एचडीआयएल) दोन संचालकांना अटक केली होती. त्याचबरोबर कंपनीची 3500 कोटींची संपत्तीही जप्त केली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने 4355.43 कोटी रुपयांच्या या बँक घोटाळ्यामध्ये सोमवारी एफआयआर दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी 17 लोकांविरोधात लुकआऊट नोटीसही प्रसिद्ध केली आहे. आरोपी राकेश वधावन आणि सारंग राकेश वधावन या पितापुत्रांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. चौकशीत त्यांनी समाधानकारक उत्तरे दिले नसल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. या घोटाळ्यासंबंधी सर्वजणांची चौकशी केली जाणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पीएमसी बँकेच्या ग्राहकांना 3 ऑक्टोबर रोजी आरबीआयने दिलासा दिला. बँकेच्या ग्राहकांना रक्कम काढण्याची मुदत 10,000 रुपयांवरुन वाढवून ती 25,000 रुपये केली. सुरुवातीला आरबीआयने खातेधारकांना सहा महिन्यांत केवळ 1,000 रुपयेच काढण्याला परवानगी दिली होती.