Breaking News

डेव्हिड वॉर्नरचे नाबाद दीडशतक, ऑस्ट्रेलिया 1/312

ब्रिस्बेन
डेव्हिड वॉर्नर (नाबाद 151), जो बर्न्स (87) व लाबुशाने (नाबाद 55) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने येथील गाबा मैदानावर सुरु असलेल्या पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसऱया दिवशी 87 षटकांत 1 बाद 312 धावा केल्या आहेत. दुसऱया दिवशीचा खेळ थांबला तेव्हा वॉर्नर 151 व लाबुशाने 55 धावांवर खेळत होते. पाकिस्तानचा पहिला डाव 240 धावांवर आटोपला होता. ऑसी संघाकडे 72 धावांची आघाडी आहे.
प्रारंभी, बॉल टॅम्परिंगप्रकरणी एका वर्षाची निलंबनाची शिक्षा संपल्यानंतर पहिलीच कसोटी खेळणाऱया वॉर्नरने पाक गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. वॉर्नर व जो बर्न्स जोडीने 222 धावांची दणकेबाज सलामी दिली. 33 वर्षीय वॉर्नरचे हे कसोटी कारकिर्दीतील 22 वे शतक ठरले. 56 धावांवर त्याला जीवदान मिळाले होते, या जीवदानाचा फायदा घेत त्याने शानदार शतकी खेळी साकारली. त्याने 265 चेंडूचा सामना करताना 10 चौकारासह नाबाद 151 धावा फटकावल्या. बर्न्सने त्याला चांगली साथ देताना 166 चेंडूत 10 चौकारासह 97 धावांचे योगदान दिले. शतकाच्या उंबरठयावर असताना त्याला यासीर शाहने बाद करत ही जोडी फोडली. विशेष म्हणजे, वॉर्नरने तब्बल दोन वर्षानंतर शतकी खेळी साकारली. अलीकडे झालेल्या ऍशेस मालिकेत त्याल ापाच कसोटीत 95 धावाच करता आल्या होत्या. या सामन्यात मात्र त्याने शतकी खेळी साकारत दोन वर्षांचा शतकांचा दुष्काळ संपुष्टात आणला. बर्न्स बाद झाल्यानंतर वॉर्नरने लाबुशानेला सोबतील घेत दुसऱया गडयासाठी 90 धावांची भागीदारी करत संघाला त्रिशतकी मजल मारुन दिली. दरम्यान, वॉर्नरने आपले दीडशतक साजरे केले. लाबुशानेही 6 चौकारासह नाबाद 55 धावा करत त्याला चांगली साथ दिली. दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात खेळताना 87 षटकांत 1 बाद 312 धावा केल्या होत्या. ऑसी संघाकडे आता 72 धावांची आघाडी असून दिवसअखेरीस वॉर्नर 151 व लाबुशाने 55 धावांवर खेळत होते. पाककडून कसोटी पदार्पण करणाऱया 16 वर्षीय नसीम शाहने मात्र सपशेल निराशा केली. त्याने 16 षटके गोलंदाजी करताना 65 धावा दिल्या मात्र त्याला एकही बळी मिळवता आला नाही. पाककडून एकमेव बळी यासीर शाहने मिळवला.

संक्षिप्त धावफलक 
पाकिस्तान प.डाव सर्वबाद 240
ऑस्ट्रेलिया पहिला डाव 87 षटकांत 1 बाद 312 (डेव्हिड वॉर्नर खेळत आहे 10 चौकारासह 151, जो बर्न्स 166 चेंडूत 97, लाबुशाने खेळत आहे 6 चौकारासह 55, यासीर शाह 1/101).