Breaking News

कल्याण ते बदलापूर, आसनगावपर्यंत 15 डबा जलद लोकल

Local train
ठाणे
 बदलापूर, अंबरनाथ, खोपोली, कसारादरम्यान वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेत कल्याणच्या पुढे बदलापूर, आसनगाव, खोपोली, कसारापर्यंत 15 डबा जलद लोकल चालविण्याच्या मध्य रेल्वेच्या प्रयत्नांना आर्थिक बळ लाभल्याने हा प्रकल्प दोन महिन्यांत मार्गी लागणार आहे. ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’ने याकरिता निधी देण्याची परवानगी दर्शवली असून तीन महिन्यांत हा प्रकल्प मार्गी लावला जाईल.
मध्य रेल्वेवर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढतेच आहे. ठाणे ते खोपोली, कसारादरम्यान असलेल्या स्थानकातून गर्दीच्या वेळी प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. कल्याणपुढे खोपोली किंवा कसारापर्यंत जलद लोकल गाड्या धीम्या होतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेतील प्रवास अगदीच कंटाळवाणा होतो. एकूणच या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुकर व जलद करण्यासाठी मध्य रेल्वेने वर्षभरापूर्वी पंधरा डबा जलद लोकल चालवण्याचे नियोजन सुरू केले. तसा प्रस्ताव तयार करून रेल्वे बोर्डाकडेही पाठवला. त्याला मंजुरी मिळाली असून आता या प्रकल्पाला मुंबई रेल्वे विकास महामंडळानेही (एमआरव्हीसी) निधी देण्यास तयारी दर्शवली आहे. प्रकल्पाची किंमत ही 490 कोटी रुपये आहे.
प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत होईल. पहिल्या टप्प्यात कल्याण ते बदलापूर, दुसर्‍या टप्प्यात कल्याण ते आसनगाव आणि तिसर्‍या टप्प्यात बदलापूर ते खोपोली आणि आसनगाव ते कसारा असे काम केले जाईल. यामध्ये फलाटांची लांबी वाढवणे, ओव्हरहेड वायरसह अन्य तांत्रिक कामे केली जातील. बारा डबा लोकल गाड्यांना आणखी तीन डबे जोडून त्याचे पंधरा डब्यांत रूपांतर केले जाणार आहे. त्यामुळे सध्या सीएसएमटी ते कल्याण ते सीएसएमटी धावणार्‍या जलद लोकल बदलापूर, आसनगाव, खोपोलीपर्यंत धावतील. शिवाय आणखी पंधरा डबा लोकल चालवणेही शक्य होईल.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी हे काम तीन टप्प्यांत होणार असल्याचे स्पष्ट केले. ‘सीएसएमटी स्थानकातील पाचवा आणि सहाव्या फलाटाची लांबीही वाढवण्याचे काम केले जाणार आहे. याशिवाय अंबरनाथ, बदलापूर, आसनगाव, टिटवाळा, कसारा, खोपोली येथील यार्ड रिमॉडेलिंगही केले जाईल,’ असेही ते म्हणाले.
सध्या दोनच गाड्या
साधारण दहा वर्षांपूर्वी मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण पंधरा डबा जलद लोकल गाडी धावली. आता आणखी एक पंधरा डबा लोकल या मार्गावर चालवली जात आहे. दोन लोकलच्या दिवसभरात 22 फेर्‍या होतात.