Breaking News

पाथर्डी तालुक्यासाठी 19 कोटी अनुदान

शेतकर्‍यांच्या खात्यावर लवकरच वर्ग होणार

पाथर्डी/ प्रतिनिधी
तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची मदत म्हणून सरकारने 19 कोटी 46 लाख 5 हजार रूपयांचे अनुदान मंजूर केले आहे. लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग होणार आहे, असे नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी सांगितले.
ते म्हणाले, तलाठ्यांकडून मूळ यादी व पंचनामे केलेल्या याद्यांनुसार शेतकर्‍यांच्या खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे. तलाठी यांच्याकडून प्राप्त होणार्‍या यादीनुसार टप्प्याटप्प्याने शेतकर्‍यांच्या खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे सर्व पंचनामे पूर्ण झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
     ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत असे आदेश राज्य सरकारने दिले होते. तसेच खासदार डॉ. सुजय विखे यांनीदेखील पाथर्डी येथील तहसील कार्यालयात सर्व अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे त्वरित पंचनामे करावेत. पंचनामे करत असताना या पंचनाम्यात सर्व पिकांचा समावेश करावा. कोणीही यापासून वंचित राहू नये यासंबंधी त्यांनी सूचना केल्या होत्या. डॉ. विखे यांच्या बैठकीआधीही तहसीलदार नामदेव पाटील यांनी देखील शेतकर्‍यांच्या मागणीला प्रतिसाद दिला होता. तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी साहाय्यक यांची संयुक्तपणे बैठक घेत पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.