Breaking News

‘फेज-2’प्रमाणे अमृत योजनेची वाट लागणार

अहमदनगर/प्रतिनिधी
“केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत कामासाठी नेमलेल्या मे. शोनन इंजिनिअरिंग वर्क्स प्रा.लि.,पुणे या संस्थेने दिलेल्या कामाच्या मुदतीत काम पूर्ण केलेले नसल्यामुळे या संस्थेला कामासाठी मुदतवाढ देऊ नये अन्यथा अमृत योजनेची ‘फेज - 2’ सारखी वाट लागण्याची भीती आहे. त्यामुळे या संस्थेचे काम रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी’’, अशी मागणी उपमहापौर मालन ढोणे यांनी महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत महानगरपालिकेच्या कामासाठी मे. शोनन इंजिनिअरिंग वर्क्स प्रा.लि., पुणे या कंपनीची निविदा मंजूर होऊन त्यांना दि.1 नोव्हेंबर 2017 मध्ये महानगरपालिकेने कामाचा कार्यारंभ आदेश दिलेला आहे. सदरील काम दोन वर्षात पूर्ण करण्याची अट असतानाही हे काम आजअखेर पूर्ण केलेले नाही. या कामाची एकूण आर्थिक प्रगती-36 टक्के व एकूण भौतिक प्रगती-42 टक्के इतकी असल्याचे निदर्शनास येते. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या सूचनेनुसार दि.31 ऑक्टोबर 2019 पर्यंत काम पूर्ण करणे आवश्यक होते. सदरील संस्थेच्या सद्यस्थितीच्या कामाची परिस्थिती पाहता हे काम पुढील तीन ते चार वर्षे पूर्ण होणार नाही. ही संस्था अकार्यक्षम असून काम करण्यास सक्षम नाही. निविदा अटी व शर्तीचे भंग करणारे काम त्यांच्याकडून होत आहे. शहर पाणीपुरवठा योजना फेज-2 चे व अमृत योजनेचे काम मार्गी लागत नसल्याने जनतेस पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अमृत योजनेचे काम रद्द न केल्यास शहर पाणीपुरवठा योजना फेज-2 सारखेच हे काम रखडले जाईल व शासनाकडून येणार्‍या अनुदानाचा गैरवापर होऊन या कामाचीही विल्हेवाट लागणार आहे. या संस्थेला मुदतवाढ देणे महापालिकेच्या हिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही. यामुळे महापालिकेने अमृत योजनेचे काम रद्द करुन त्यांना काळ्या यादीत टाकणे तसेच नव्याने प्रसिद्ध केलेल्या कामास अतिरिक्त खर्च आल्यास सदरचा खर्च मे. शोनन इंजिनिअरींग वर्क्स प्रा.लि.पुणे यांच्याकडील सुरक्षा रक्कम, जंगम मालमत्ता, बँक खाते इ. स्त्रोतांमधून वसूल करण्यात यावेत’’, अशी मागणी उपमहापौर मालन ढोणे यांनी आयुक्तांकडे केली आहे.