Breaking News

200 तक्रारदारांना बक्षिसाची प्रतीक्षा

मुंबई
 ‘खड्डे दाखवा, 500 रुपये मिळवा’ या मोहिमेसाठी मुंबईकरांनी पालिकेच्या योजनेला प्रतिसाद देत पालिकेच्या अ‍ॅपवरून सुमारे एक हजार तक्रारी केल्या असल्या तरी त्यापैकी सुमारे 200 पेक्षा अधिक तक्रारीत खड्डे बुजवण्यातच आलेले नाहीत. दुसरीकडे तक्रारदारांना 500 रुपये बक्षिसाचीही प्रतीक्षा आहे.
खड्डा दिसल्यास त्याची तक्रार अ‍ॅपवर करा आणि 24 तासांत खड्डा न बुजवला गेल्यास 500 रुपयांचे बक्षीस मिळवा, अशी योजना मुंबई महापालिकेने 1 नोव्हेंबरपासून लागू केली. या योजनेअंतर्गत 2 नोव्हेंबपर्यंत तब्बल 695 तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी केवळ 340 खड्डे बुजवण्यात आले. ‘खड्डे दाखवा आणि 500 रुपयांचे बक्षीस मिळवा’ अशी ही योजना आहे. काही भागांत फारच वेगाने प्रतिसाद मिळत असला तरी काही ठिकाणी मात्र 48 तासांनीही खड्डे बुजवण्याचे काम झाले नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
पालिकेच्या विभाग कार्यालयांकडे खड्डे भरण्यासाठी आलेले कोल्डमिक्सचे मिश्रण अतिशय कमी असल्यामुळे केवळ तक्रारीतील खड्डे भरण्यापुरतेच मिश्रण नेऊन तेवढाच खड्डा भरण्याकडे या कर्मचार्‍यांचा कल असतो. आजूबाजूला दुसरा मोठा खड्डा दिसला तर तो बुजवण्यास मात्र कर्मचारी तयार नसतात.
‘पॉटहोल वॉरियर्स’ या संस्थेचे मुश्ताक अन्सारी यांनी 1 तारखेपासून एकूण पाच ठिकाणच्या खड्ड्यांच्या तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी केवळ दोनच तक्रारींतील खड्डे बुजवले गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. माहीम कोळीवाड्याजवळील एका खड्ड्याची तक्रार 2 नोव्हेंबरला रात्री साडेआठ वाजता केली होती. 3 नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ वाजता खड्डा भरल्याचा संदेश आला. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहिले तर तो खड्डा बुजवलेला होता, अशी माहिती अन्सारी यांनी दिली. मात्र धारावी येथील सायन माहीम लिंक रोडवरील पिला बंगलासमोरील खड्डा, बांद्रा पश्‍चिममधील जैन मंदिर रोडवरील खड्डा, सांताक्रूझ पाइपलाइन रोडवरील हयात हॉटेलसमोरचा खड्डा अद्याप बुजवले नसल्याचे त्यांनी सांगितले.

मनुष्यबळ, सामग्रीचा तुटवडा?

पालिकेच्या या योजनेमुळे अभियंत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या योजनेच्या माहितीबाबत पालिकेने कोणतेही परिपत्रक काढून माहिती दिलेली नाही, असे विभाग कार्यालयातील अभियंत्यांचे म्हणणे आहे. तर विभाग कार्यालयात पुरेसे कोल्डमिक्सही उपलब्ध नसल्याचे अभियंत्यांचे म्हणणे आहे. पालिकेकडे खड्डे बुजवण्यासाठी अग्निशामक दलासारखी 24 तासांची अशी यंत्रणा नाही. त्यामुळे शनिवारी एखादी तक्रार आली तर तो खड्डा बुजवण्यासाठी रविवारी कर्मचारी उपलब्ध नसतात, अशी प्रतिक्रिया एका अभियंत्याने दिली आहे.