Breaking News

अश्‍वरोहणात 20 वर्षानंतर प्रथमच भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये

फौआद मिर्झा यांचे यश वैयक्तिक गटात ठरले पात्र

Favad Mirza
नवी दिल्ली
अश्‍वारोहण (इक्वेस्ट्रियन) या क्रीडाप्रकारात भारतीय फारसे नाहीत पण आता फौआद मिर्झा हे ही कमी भरुन काढण्याच्या मार्गावर आहेत. हा घोडेस्वार 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी वैयक्तिक स्पर्धेत पात्र ठरला आहे आणि तब्बल 20 वर्षानंतर कुणी भारतीय घोडेस्वार ऑलिम्पिक अश्‍वारोहण स्पर्धेत दिसणार आहे. फौआद यांच्याआधी केवळ दोनच भारतीय या क्रीडाप्रकारात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत यावरुन फौआद यांची कामगिरी किती विशेष आहे याची कल्पना यावी.
यासंदर्भात आंतरराष्ट्रीय इक्वेस्ट्रियन फेडरेशन 20 फेब्रुवारी 2020 रोजी अधिकृत घोषणा करणार आहे. दक्षिण- पूर्व आशिया-ओशियानिया गटाच्या वैयक्तिक पात्रता स्पर्धेत ‘ग’ गटात अव्वल स्थानासह मिर्झा यांनी हे यश प्राप्त केले आहे. फौआद यांनी आशियाडमध्ये आधीच दोन पदके जिंकून देशाचा गौरव वाढविलेला आहे. फौआद यांच्याआधी भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये अश्‍वारोहणात इम्तियाज अनीस (सिडनी 2000) आणि दिवंगत विंग कमांडर आय. जे. लांबा (अटलांटा 1996) यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. मिर्झा यांनी पात्रता स्पर्धेच्या सहा प्रकारांत 64 गूण कमावले. मी ऑलिम्पिक कोट्याची पात्रता मिळविण्याच्या मार्गावर असल्याची मला जाणिव होती पण चीन व थायलंड हे संघ म्हणून पात्र ठरेपर्यंत मला वाट पहावी लागणार होती. हे दोन्ही गेल्या आठवड्यात पात्र ठरले. हे दोन्ही देश सांघिक स्पर्धेत पात्र ठरले नसते तर त्यांनी वैयक्तिक जागा पटकावल्या असत्या आणि मी पात्र ठरू शकलो नसतो अशी माहिती फौआद यांनी दिली. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याचा आनंद आहे पण अजून भरपूर काम बाकी आहे. बर्‍याच रकान्यांपैकी आता फक्त एका रकान्यावर टीक झाली आहे. आता चांगली तयारी करुन मला स्पर्धेत उत्तम फॉर्मसह सहभागी व्हावे लागणार आहे असे फौआद यांनी म्हटले आहे. मिर्झा यांचा हुकुमी घोडा सिग्नूर मेडिकॉट हा यंदा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे या आशियाड रौप्यपदक विजेत्याच्या तयारीला धक्का बसला. माझ्या मुख्य घोड्याची कमतरता तर जाणवतेच आहे पण दुसरे दोन घोडेसुध्दा चांगली कामगिरी करत आहेत. ते मेडिकॉटएवढे चांगले नसले तरी प्रगती चांगली आहे आणि त्यांनी मला इथवर पोहचवले आहे. मिर्झा हे 2018 मध्ये पहिल्यांदा त्यावेळी चमकले जेंव्हा त्यांनी जाकार्ता आशियाडमध्ये भारताला 1982 नंतर प्रथमच अश्‍वारोहणात वैयक्तिक पदक (रौप्य) जिंकून दिले. याशिववाय सांघिक रौप्यपदकातही त्यांचे योगदान होते. आपल्या या यशासाठी त्यांनी एम्बस्सी समूह आणि जितु वरवाणी यांनी केलेल्या अर्थसहाय्यासाठी धन्यवाद दिले आहेत.