Breaking News

मच्छीमारांना 2100 कोटीची भरपाई देण्यासाठी समिती : राज्यपाल

रत्नागिरी
कोकणातील मच्छीमारांना अलीकडेच आलेल्या नैसर्गिक आपत्तीची नुकसानभरपाई म्हणून 2100 कोटी रुपयांची भरपाई मिळवून देण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्‍वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. राज्यातील कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यांना भरपाई देण्याची मागणी कोळी महासंघाच्या वतीने राज्यपालांना करण्यात आली. महासंघाचे अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य रमेश दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना नुकसानीचे स्वरूप पटवून दिले. राज्यात 28 हजार मच्छीमारी नौका असून 20 नौका सागरी वादळामुळे बंदरातच राहिल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांना मोठे नुकसान पोहोचले आहे. मासेमारीवर झालेला खर्च, डिझेल, बर्फ, खलाशी यावर अवलंबून असलेल्या कष्टकरी समाजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सहा सिलिंडर मच्छीमारी नौकेपासून एकेरी मासेमारी करणारा पारंपरिक मासेमारही अडचणीत सापडला आहे. त्यांचे नुकसान लक्षात घेऊन त्यांना सानुग्रह मदत मिळावी, यासाठी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर कोळी महासंघाने आढावा घेतला होता. त्याअनुषंगाने 2100 कोटी रुपयांची मदत मिळावी, असे निवेदन राज्यपालांना केले. त्याला राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.