Breaking News

कुत्र्यावरच्या प्रेमाखातर 24 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेऊन केली आत्महत्या

कोइम्बतूर 
आपल्या लाडक्या पाळीव कुत्र्याला वडिलांनी दूर सोडून यायला सांगितलं म्हणून एका 24 वर्षांच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तामिळनाडूच्या कोइम्बतूर शहरात घडली. कविता असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. ती खासगी कंपनीत नोकरीला होती आणि सीझर नावाचा कुत्रा तिच्याकडे गेली 2 वर्षं राहात होता.

कुत्र्याच्या सततच्या भुंकण्याचा त्रास होत असल्याची तक्रार कविताच्या शेजार्‍यांनी तिच्या वडिलांकडे केली होती. त्यामुळे कुत्रा पाळण्यावरून तिच्यात आणि वडिलांच्यात वाद झाले. वडिलांनी तिच्या सीझर कुत्र्याला सोडून यायला सांगितलं.

बुधवारी रात्री विजांच्या कडकडासह पाऊस झाला. त्यामुळे हा कुत्रा घाबरला आणि बिथरून भुंकायला लागला. तो रात्रभर भुंकत होता. त्याची तक्रार शेजार्‍यांनी केली. त्यामुळे वडिलांना कविताला कुत्रा सोडून द्यायला सांगितलं.

त्यानंतर आपला लाडका कुत्रा दूर जाणार हे सहन न झाल्याने कविताने घरातच पंख्याला लटकून आत्महत्या केली. तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीही लिहून ठेवल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. ’सर्वांना शांततेत जगता यावं म्हणून हा मार्ग निवडत आहे’, असं तिने या कथित चिठ्ठीत लिहिलं आहे.’आईवडील आणि भावाने सीझरला सांभाळावं आणि मला माफ करावं. दररोज मंदिरात जावं’, असंही कविताने चिठ्ठीत म्हटल्याचं समजतं.