Breaking News

अयोध्येला पुन्हा 24 तारखेला जाणार : उद्धव ठाकरे

मुंबई
न्यायालयाच्या या आदेशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. सोनेरी अक्षरांनी लिहावा असा हा आजचा दिवस आहे. प्रभू रामचंद्र यांचा नेमका जन्म कुठे झाला होता यांच्या वरून वाद सुरू होता आणि मला नक्कीच आनंद आहे की तो वाद आज संपलेला आहे. सर्व समाजाने हिंदू, मुसलमान, इतर सुद्धा सर्व धर्म आहेत, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो कारण न्यायदेवतेने दिलेला हा निकाल, हा न्याय सर्वांनी स्वीकारलेला आहे.
मला असं वाटतं जी हिंदूंची श्रद्धा आहे, भावना आहे त्या भावनेला आज न्याय मिळालेला आहे, याचा आनंद व्यक्त करत असताना मी सर्वांना सूचना केलेल्या आहेत की कुठेही वेडवाकड होईल असा काही करू नका, आनंद जरूर साजरा करा. आजच्या दिवशी शिवसेना प्रमुखांची आठवण येणे स्वाभाविक आहे. कारण अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. तसेच राम मंदिरासाठी लालकृष्ण अडवाणींचे मोठे योगदान आहे. लवकरच अडवाणींची भेट घेणार असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच गेल्या वर्षी अयोध्येला गेल्याची आठवणही त्यांनी करून दिली. 24 नोव्हेंबरला शिवनेरीची माती अयोध्येमध्ये ठेवली आणि वर्षाच्या आत निकाल लागला. सर्व सुरळीत राहिले तर मी पुन्हा 24 तारखेला अयोध्येला जाईन. येत्या दोन-तीन दिवसांत पुन्हा शिवनेरीवर जाणार आहे. एक अध्याय संपला असला तरीही दुसरा पर्व सुरू होत आहे. आनंद साजरा करा पण कोणाच्या भावना दुखावू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेला केले.