Breaking News

येत्या 24 तासात महाचक्रीवादळाचे रौद्ररुप

महाचक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही फटका

मुंबई
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महाचक्रीवादळानं रौद्ररुप धारण केल आहे. पुढील 24 तासांत हे वादळ गुजरात किनारपट्टीकडे वळण्याची शक्यता आहे. 6 नोव्हेंबरला मध्यरात्री ते 7 नोव्हेंबरच्या पहाटे तीन वाजेपर्यंत ते पोरबंदर दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरात तसंच उत्तर कोकणातील किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पालघर, ठाणे जिल्ह्यांसह नंदुरबार, धुळे, नाशिक या पाच जिल्ह्यांत वादळामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याकडून अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आलेला आहे. त्यात भर म्हणून आता अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महाचक्रीवादाळाचा प्रभाव आणखी चार दिवस कायम राहणार असल्याचे समोर आले आहे. हे चक्रीवादळ गुजरात किनार्‍याला धडकल्यावर त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. या पार्श्‍वभूमीवर एनडीआरएफचे पथक सज्ज झाले आहे.6 नोव्हेंबरला मध्यरात्री किंवा 7 नोव्हेंबरला पहाटे हे वादळ गुजरात किनार्‍याला धडकण्याचा अंदाज आहे. या वादळाच्या प्रभावाने ताशी 100 ते 110 किमी वेगाने वारे वाहतील. 120 किमी प्रतितास पर्यंत वादळाचा जोर वाढू शकतो. या संपूर्ण काळात समुद्र खवळलेला असेल. पुढचे तीन दिवस समुद्रकिनार्‍यावर पर्यटनासाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

पुढचे 3 दिवस पावसाचे

अरबी समुद्रात निर्माण झालेले ’महा’चक्रीवादळ गुजरात किनार्‍याला धडकल्यावर त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. त्यामुळे पुढचे तीन दिवस वादळी पावसाचे असतील, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (खचऊ)दिला आहे.दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ’महा’चक्रीवादळामुळे उद्भवणार्‍या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीचा केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा. राजीव गौबा यांनी या संदर्भात महाराष्ट्र, गुजरात, दीव-दमणच्या मुख्य सचिवांशीहा संवाद साधला आहे.

अतितीव्र चक्रीवादळात रुपांतरित झालेले ’महा’ हे वादळ हळूहळू गुजरातच्या किनार्‍याच्या दिशेने सरकू शकते. अरबी समुद्रातले हे वादळ किनारपट्टीच्या दिशेने आले तर त्याचे परिणाम संपूर्ण पश्‍चिम किनारपट्टीवर जाणवू शकतोत. वादळाचा सर्वाधिक फटका गुजरातला बसणाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना याचा फटका अधिक बसेल. यामुळे उत्तर महाराष्ट्रात सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळाच्या पार्श्‍वभूमीवर पालघर जिल्ह्यात शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुख्य सचिवांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या पुणे येथे तैनात असून आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल, खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनार्‍यालगतच्या जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही या वेळी सांगण्यात आले.