Breaking News

’बुलबुल’ चक्रीवादळ आगामी 24 तासात धडकणार

Bulbul Cyclone
नवी दिल्ली
देशभरात ’माहा’ या चक्रीवादळाने घातलेल्या थैमानामुळे शेतकर्‍यांचे हाता तोंडाशी आलेले पीक वाया गेले. माहा या चक्रीवादळाने नुकसान झाल्यानंतर पुन्हा बुलबुल या चक्रीवादळाचे संकट घोंघावतांना दिसून येत आहे.
बुलबुल चक्रीवादळ आगामी 24 तासात धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बंगालच्या उपसागरात ’बुलबुल ’चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे.  बुलबुल वादळ ताशी 6 किमी वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. बुलबुल पश्‍चिम बंगाल आणि बांगलादेशच्या दिशेने जाऊ शकते. अंदमानात येत्या 24 तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात हे नवीन चक्रीवादळ तयार होत आहे. यंदाचे हे 7 वे चक्रीवादळ असेल. याची तीव्रता वाढत जाणार असून 10 नोव्हेंबरपर्यंत त्याचा प्रभाव कायम राहील.
हवामान विभागाने चक्रीवादळ ’महा’ हे अत्यंत तीव्र वादळाच्या श्रेणीत गणले आहे. हे वादळ ताशी 21 किलोमीटर वेगाने सतत वाढत आहे. हे आता गुजरातमधील पोरबंदरपासून 480 किमी अंतरावर आहे. त्याच वेळी, गुजरातमधील वेरावळ आणि दीवपासून ते 570 किमी अंतरावर आहे. येत्या 24 तासात हे वादळ गुजरात आणि दीव किनारपट्टीच्या भागात पोहचेल. ओडिशामध्ये ’बुलबुल’ची भीती सध्या दिसत आहे. हे वादळ ओडिशात किंवा पश्‍चिम बंगालमध्ये कोणत्या ठिकाणाहून येईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही सावधगिरीचा इशारा म्हणून ओडिशाच्या सर्व बंदरांवर धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी ओडिशाला फनी चक्रीवादळाचा सामना करावा लागला होता. 11 नोव्हेंबरपर्यंत चक्रीवादळाचा उत्तर दिशेने प्रवास होणार असून, ते पश्‍चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

प्रशासनाकडून मच्छिमारांना सावधानतेचा इशारा
वादळाची गती ताशी 80 किलोमीटर असेल आणि 90 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान अरबी समुद्रात जोरदार लाटा वाढण्याची शक्यता आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. तथापि, 8 नोव्हेंबरपर्यंत हे वादळ हळूहळू कमकुवत होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.