Breaking News

तस्कर महिलांनी गिळल्या एक किलो सोन्याच्या 30 कॅप्सूल

चेन्नई
सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कर कोणकोणत्या शक्कल वापरतात, ते सांगता येत नाही. चेन्नईमध्ये अशाच तस्कर महिलांनी एक किलो सोन्याच्या 30 कॅप्सूल गिळल्याचा प्रकार समोर आला आहे.
या महिलांच्या पोटांतील सोने परत मिळविण्यासाठी तस्करांच्या टोळीने या महिलांचेच अपहरण केल्याची घटना चेन्नईमधील एका रूग्णालयात समोर आली. या तस्कर महिलांनी 30 कॅप्सूल गिळल्या होत्या. त्यात एक किलोहून अधिक सोनं होते. ते सोने पोटातून काढण्यासाठी सीमा शुल्क अधिकारी त्यांना रुग्णालयात घेऊन गेले होते. त्याचवेळी तस्करांच्या टोळीने या महिलांचे अपहरण केले. सूत्रांच्या माहितीनुसार, या तस्कर महिलांनी साधारण 30 कॅप्सूल गिळल्या होत्या. प्रत्येक कॅप्सूलमध्ये सोने भरलेले होते. त्याचे एकूण वजन एक किलोहून अधिक होते. सीमा शुल्क विभागाचे अधिकारी त्यांना रुग्णालयात घेऊन जात होते. त्याचवेळी रुग्णालयाच्या आवारात तस्करांच्या टोळीने त्यांचे अपहरण केले. या दोन्ही तस्कर महिला पुन्हा पोलिसांसमोर हजर झाल्या. एका टोळीने त्यांचे अपहरण केले होते. त्यांना एका खासगी रुग्णालयात नेले. आमच्या पोटातून सोने काढून घेतल्याचा दावा या महिला तस्करांनी केला. पल्लवरम पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून टोळीचा शोध सुरू केला आहे. तसेच सीमा शुल्क विभागाचे अधिकारी या महिलांची चौकशी करत आहेत. अपहरणकर्त्यांची माहिती त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला आहे.


फुगलेले पोट बघून आला संशय
टेरेसा आणि फातिमा अशी या दोन्ही तस्कर महिलांची नावे आहेत. त्या कोलंबोहून आल्या होत्या. त्यांचे फुगलेले पोट बघून सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना संशय आला. त्यांनी या महिलांना विमानतळावरच रोखले. त्यांच्या पोटात सोने असल्याचे स्क्रीनिंग रुममध्ये केलेल्या तपासणीत समोर आले. सोने असलेल्या कॅप्सूल गिळल्या आहेत, अशी कबुलीही या महिलांनी दिली होती.