Breaking News

निंबळकला 5 लाख लिटर पाणी जादा मिळावे

अहमदनगर/प्रतिनिधी
नगर तालुक्यातील निंबळक गावाची वाढलेली लोकसंख्या विचारात घेता व पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी गावाला प्रतिदिन 5 लाख लिटर पाणी वाढवून मिळण्याची मागणी निंबळक ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. ग्रामपंचायतच्या वतीने एमआयडीसी पुणेचे मुख्य अभियंता एस.आर.वाघ, अधीक्षक अभियंता दराडे व नगरचे उपअभियंता एस.जी. राठोड यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. मागणीचे निवेदन निंबळक ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आले. यावेळी माजी सरपंच विलास लामखडे, ग्रामविकास अधिकारी अनिल भाकरे, ग्रा.पं. सदस्य बाबासाहेब पगारे, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, निंबळक गावाला एमआयडीसीकडून प्रतिदिन 5.50 लक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. सन 2001 च्या गावाच्या जनगणनेनुसार हा पाणीपुरवठा होत आहे. परंतु सन 2011 च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 8300 इतकी वाढली आहे. तसेच गाव हे औद्योगिक क्षेत्रालगत असल्याने गावात वास्तव्यास आलेल्या कामगार वर्गालाही  ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. सध्या गावाची लोकसंख्या 20 हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे पाणीपुरवठा कमी पडत असून, गावासाठी दिवसाला 10 लक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. तरी गावासाठी नवीन पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होणार असून, यामध्ये प्रतिदिन 5 लाख लिटर पाणी वाढवून मिळण्याची मागणी निंबळक ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.