Breaking News

ईपीएस 95 पेन्शनधारकांचे धरणे आंदोलन

अर्थमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडण्याचे कामगार मंत्र्यांच्या सचिवांचे आश्‍वासन

अहमदनगर/प्रतिनिधी
पेन्शन वाढसह इतर प्रलंबीत मागण्यांसाठी अखिल भारतीय ईपीएफ पेन्शनर संघटना राष्ट्रीय समन्वय समितीच्या वतीने दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर देशव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये देशातील पेन्शनर संघटनेचे पदाधिकारींसह महाराष्ट्रातील पेन्शनर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघांचे चिटणीस कॉ. आनंदराव वायकर यांनी दिली.

 संघटनेच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री यांच्या सचिवांची भेट घेतली. पेन्शन वाढीबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. पेन्शन वाढीचा प्रस्ताव अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापुढे ठेवण्याचे आश्‍वासन कामगार मंत्र्यांच्या सचिवांनी दिले. तर पेन्शन विक्रीची रक्कम पुनर्स्थापित करण्याचा निर्णय झाला असून, त्याचे परिपत्रक लवकरच काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदर भेट घडविण्यात केरळचे खासदार मोहंमद बशीर यांनी पुढाकार घेतला होता.

 दिल्ली येथे झालेल्या लक्षवेधी धरणे आंदोलनात महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली येथील पेन्शनर बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद), श्रीरंग बारणे (मावळ), प्रताप जाधव (बुलढाणा), एम.के. राघवन, वाय.ए. करीम, ए.एम. आरिफ, शनमुगम, मोहंमद बशीर (केरळ) या खासदारांनी आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दर्शविला. तर सर्व खासदारांनी सदर प्रश्‍नी लोकसभेत प्रश्‍न उपस्थित करण्याचे आश्‍वासन दिले. नवी दिल्ली येथील केरळ हाऊस सभागृहात संघटना बळकटीच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यात आली. यामध्ये संघटनेच्या विविध राज्यातील प्रतिनिधींनी भाग घेतला. धरणे आंदोलनाचे नेतृत्व एम. धर्मजन, कॉ.अतुल दिघे, एम.एम. रेड्डी, कॉ. उदय भट, कॉ. आनंदराव वायकर, देवराव पाटील, कॉ. व्ही. एम. पतंगराव, एम. आर. जाधव, आत्माराम मोढळे, वसंतराव तोरडमल, बलभिम कुबडे, टी. के. कांबळे, अनंत कुलकर्णी, गोपाळ पाटील, ए. ए. सुरी, शिवाजी बामणे, डी. बी. जोशी यांनी केले.