Breaking News

जनतेच्या सहकार्यातून ‘स्वच्छ सुंदर नगर’चा संकल्प!

अहमदनगर/प्रतिनिधी
“शहरामध्ये कचर्‍याची समस्या निर्माण झाली असून ही समस्या सोडविण्यासाठी नागरिकांमध्ये कचर्‍यासंबंधी जनजागृती व्हावी यासाठी स्वच्छता रक्षक समिती,  रोटरी क्लब, प्रियदर्शनी यांच्या वतीने शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करणार आहे. शहरातील स्त्री-पुरुषांना एकत्र करुन नागरिकांच्या सहकार्यातून शहर स्वच्छ सुंदर नगर करण्याचा मानस आहे’’, असे प्रतिपादन डॉ.आश्‍लेषा भांडारकर यांनी केले.
येथील सहकार सभागृह ते महात्मा फुले चौकापर्यंत रस्त्याची स्वच्छता, वृक्षारोपण, जनजागृती फलक लावण्यात आले. तसेच रस्त्यावर रांगोळी काढून स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी प्रतिभा धूत, ज्योती दीपक, अनुपमा गाडेकर, श्यामा मंत्री, कविता मंत्री, शीतल मंत्री, किरण कालरा, शशी बिहावी, शर्ली थोलर, भाग्यलक्ष्मी भट, सुरेखा मनीयार, रेखा जोशी, मंजू  धूत, ज्योती बोरगे आदी उपस्थित होते. यावेळी प्रतिभा धूत म्हणाल्या, “शहर कचरामुक्त करण्यासाठी सर्व महिला स्वच्छता रक्षक समितीच्या माध्यमातून काम करणार आहे. तसेच मनपा सफाई कर्मचार्‍यांच्या आरोग्य प्रश्‍नासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या संदर्भात शाळा, कॉलेजमध्ये जनजागृती करणार असून प्रत्येक भागामध्ये दोन स्वच्छता रक्षक नेमणार आहे. घरोघरी जाऊन घरीच खतनिर्मिती प्रकल्प तयार करावेत. शहर स्वच्छ राहिल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न मिटणार असून यासाठी स्वच्छता रक्षक समितीच्या माध्यमातून काम करणार आहे.’’