Breaking News

किमान समान कार्यक्रमानुसार सरकार चालवा

पी. चिदंबरम यांचा महाआघाडीसाठी सल्ला

नवी दिल्ली
राज्यात नव्यानेच उदयाला आलेल्या महाविकास आघाडीला सध्या तिहार तुरुंगात असलेले काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी चार अनुभवाचे बोल सांगितले आहेत. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी स्वतःचे वैयक्तिक धोरण बाजूला ठेवून किमान समान कार्यक्रमानुसार सरकार चालवावे. यामध्ये शेतकर्‍यांचे कल्याण, गुंतवणूक, रोजगार, सामाजिक न्याय आणि महिला व बालकांचे कल्याण याकडे अधिक लक्ष द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.
चिदंबरम यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यावतीने ट्विट करीत त्यांच्या भावना सर्वांपर्यंत पोहोचविल्या आहेत. महाविकास आघाडीचे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर राज्यात औपचारिकपणे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल. चिंदबरम यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पहाटे चार वाजता राष्ट्रपती राजवट उठविण्याचा निर्णय लोकशाहीचा अपमानच होता. त्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत थांबायला त्यांना काय हरकत होती, असा प्रश्‍न चिदंबरम यांनी उपस्थित केला.  आपल्या ट्विटमध्ये चिदंबरम यांनी शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील नव्या सरकारला शुभेच्छाही दिल्या आहेत. आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्यावर आधी सीबीआयने नंतर ईडीने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.