Breaking News

भाजपकडून रात्रीच्या अंधारात दरोडा : संजय राऊत

राष्ट्रवादीच्या विधिमंडळनेतेपदावरून हकालपट्टी

मुंबई
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येणार असल्याचे दिसून येत असतांनाच राज्यात नाटयमय घडामोडीनंतर, शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्यात आली आहे. भाजपकडून रात्रीच्या अंधारात दरोडा घातला असल्याची तोफ शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. अजित पवारांवर पक्षाने तडकाफडकी कारवाई केली आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ जाहीरपणे जनतेसमोर का घेतली नाही? याचाच अर्थ हे पाप असून, भाजपने रात्रीच्या अंधारात दरोडा घालत जनतेचा विश्‍वासघात केल्याची टीका राऊत यांनी केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येण्यासाठी संजय राऊत यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी त्यांनी वारंवार बैठका आणि पत्रकार परिषदा घेऊन जनतेसमोर मांडण्याचे काम केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार, यावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र रात्रीतून राजकीय नाटयांने वळण घेत सकाळीच मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी घेतली. राष्ट्रवादी फूट पाडून अजित पवार भाजपला मिळाल्याचे यातून स्पष्ट झाले. या सगळ्या घडामोडीमुळे शिवसेना संतापली आहे. खासदार राऊत यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर तोफ डागली. भाजपने सत्ता, पद आणि पैशांचा गैरवापर केला. राजभवनालाही सोडले नाही. हेच भाजपवाले अजित पवार यांची जागा ऑर्थर रोडमध्ये आहे, असे विधानसभेत सांगायचे. याच धमक्या देऊन अजित पवार आणि इतर आमदारांना फोडले का, याचा शोध घ्यावा लागेल. कदाचित मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठका अजित पवारांसोबत ऑर्थर रोडमध्ये घेण्याचे ठरले असेल, असा टोला राऊत यांनी भाजपला हाणला. भाजपच्या या राजकारणाला राज्याची जनता योग्य ते उत्तर देईल,’ असे राऊत म्हणाले. ’भाजपने फोडाफोडी केली असली तरी शिवसेना खंबीर आहे. बंड केलेल्या आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही,’ असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या अजित पवारांच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असे शरद पवार यांनी म्हटले असले तरी ते लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होतील, असे खळवळजनक वक्तव्य भाजपचे खासदार संजय काकडे यांनी केले आहे.  मुंबईतील राजभवनात शनिवारी सकाळी 8 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्री मोठी उलथापालथ झाली. सत्तासंघर्ष सोडवण्यासाठी महाविकासआघाडीकडून सातत्यानं बैठकांचा सिलसिला सुरू होता. आज चर्चा अंतिम टप्प्यात येणार असल्याची चर्चाही होती. अखेरच्या टप्प्यात सगळं ठरत असताना मात्र अचानक राजकीय भूकंप आला आणि थेट राजभवनात मुख्ममंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. महाविकासआघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार होती मात्र त्याआधीच शनिवारी शपथविधीसोहळा पार पडल्यानं अनेक सवालही उपस्थित होत आहेत. महिन्याभरापासून सुरु असलेला सत्तसंघर्षाचा तिढा अखेर सुटला आणि एक वेगळे समीकरण समोर आले आहे.


अजित पवार मुर्दाबाद’च्या घोषणा
 महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. अजित पवार यांच्याविरोधात मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोष व्यक्त करताना दिसत आहे. मुंबईत कार्यकर्ते आक्रमक झाली आहेत. भावुक झाले आहेत. कार्यकर्त्यांकडून ’शरद पवार जिंदाबाद. अजित पवार मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या जात आहेत