Breaking News

‘आदर्श’ घोटाळ्याची ‘ईडी’कडून पुन्हा चौकशी

Adarsh building
मुंबई
कुलाबा येथील वादग्रस्त आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालयाकडून पुन्हा चौकशी सुरू झाली आहे. या घोटाळ्यामुळेच काँग्रेस नेते अशोक चव्हाण  यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, हे उल्लेखनीय.
काँग्रेसचा समावेश असलेल्या महाआघाडीचे नवे सरकार राज्यात गुरुवारी स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये अशोक चव्हाण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच आदर्श  घोटाळ्याची चौकशी सुरू झाल्याने त्यांच्या अडचणी वाढू शकतात. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात अशोक चव्हाण यांचा समावेश जवळ जवळ नक्की  आहे; पण त्याआधी ईडीचे अधिकारी कुलाबा येथे आदर्श गृहनिर्माण संस्थेत पोहचले आणि फ्लॅटची मोजणी केली. याबाबत अधिकाऱ्यांनी काहीही सांगितले नाही; पण सूत्रांच्या  माहितीनुसार गृहनिर्माण संस्थेविरोधात कारवाईसाठी मालमत्तेची माहिती घेण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात सीबीआयनं चौकशी सुरू केल्यानंतर त्यात अशोक चव्हाण यांचं  नाव पुढे आलं. त्यामुळे त्यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली. या प्रकरणात चव्हाण यांच्यासोबतच अनेक नेत्यांची नावंदेखील पुढे आली होती. कुलाबामध्ये मोक्याच्या जागेवर  उभारलेल्या 31 मजली टॉवरमध्ये नोकरशहा, राजकीय नेते आणि सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांचे फ्लॅट आहेत. या गृहनिर्माण सोसायटीतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर फ्लॅटधारकांनाही आरोपी करण्यात आले. या प्रकरणी सीबीआयनं अशोक चव्हाण यांनी आरोपी केले. त्यांना या प्रकरणामुळं मुख्यमंत्रिपदही सोडावे लागले होते. अन्य राजकीय नेत्यांचीही  चौकशी सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी मोजणीचे साहित्य आणि उपकरणे घेऊन या गृहनिर्माण संस्थेत पोहोचले आणि त्यांनी अनेक मजल्यांवरील फ्लॅटमध्ये  मोजणीही केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या पंधरवड्यात दुसऱ्यांदा चौकशी केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या गृहनिर्माण संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना  विरोध केला होता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी परिसरात येण्याच्या 15 दिवस आधी पूर्वसूचना द्यावी, असे पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे ईडीला सांगितले होते.