Breaking News

महाराष्ट्रात येणार पत्रकार संरक्षण कायदा

अहमदनगर/प्रतिनिधी
“पत्रकारांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेला पत्रकार संरक्षण कायद्याचा मार्ग मोकळा झाला असून या विधेयकावर राष्ट्रपतींनी अखेर 28 ऑक्टोबरला स्वाक्षरी केली असून, ते विधेयक आता राज्यपालांमार्फत मंत्रालयात आले आहे. पत्रकार संरक्षण कायद्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहे. येत्या काही दिवसात या संबंधीची अधिसूचना निघेल आणि हा कायदा महाराष्ट्रात लागू होणार आहे’’, असे प्रतिपादन पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक तथा परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख यांनी केले.
ते पुढे म्हणाले, “पत्रकार संरक्षण कायदा लागू होण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती व मराठी पत्रकार परिषदेने एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिर्घकालीन लढा दिला. या लढ्यात नगर जिल्हा देखील आघाडीवर होता. हा कायदा आणण्यासाठी महाराष्ट्रातील पत्रकारांनी राज्य सरकारपुढे मागणी लावून धरली होती, त्याला यश आले.’’
याबाबत अधिक माहिती देताना सचिव शेख म्हणाले, “महाराष्ट्रात अनेक पत्रकारांवर जीवघेणे हल्ले झाले तर अनेक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला आहे. पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले थांबून, हल्लेखोरांवर वचक बसण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात येण्याकरिता आंदोलने करण्यात आली. यामध्ये नगर जिल्ह्यातील पत्रकारांनी देखील अनेक आंदोलने केली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील निवेदन देण्यात आले होते. पत्रकारांच्या एकजूट लढ्याने हा कायदा अस्तित्वात येणार असून, पत्रकार संरक्षण कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य असणार आहे.’’ हा लढा यशस्वी केल्याबद्दल पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती व मराठी पत्रकार परिषदेने नाशिक विभागातील पत्रकार व सहकार्‍यांचे अभिनंदन केले.