Breaking News

दिल्लीतील प्रदूषण महाराष्ट्रात येणार नाही

मुंबई
महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल पण मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात दिल्लीतील भेटीसंदर्भात अप्रत्यक्षपणे भाष्य केले. त्यांनी म्हटले की, लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलेल. दिल्लीतील प्रदूषण महाराष्ट्रात येणार नाही. महाराष्ट्राचा निर्णय हा महाराष्ट्रातच होईल, असे राऊत यांनी सांगितले.

शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर संजय राऊत दररोज पत्रकारपरिषद घेऊन भाजपला नवनवे इशारे देत आहेत. आजच्या पत्रकारपरिषदेतही त्यांनी शिवसेनेची भूमिका आक्रमकपणे मांडली. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचा प्रमुख नेता हालचाली करत आहे. सत्तास्थापनेत केवळ एकाच पक्षाची भूमिका असल्याचे चित्र आता बदलले आहे. कारण, यंदा प्रत्येक पक्षाची, एवढेच काय अपक्षही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शिवसेनेच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार. शपथविधी ही कोणाची मक्तेदारी नाही, असे राऊत यांनी म्हटले.