Breaking News

शहरातील सिग्नल ‘असून अडचण नसून खोळंबा’

अहमदनगर/प्रतिनिधी
शहरातील अनियंत्रित वाहतुकीला आळा घालण्याच्या दृष्टीने शहरात सिग्नल उभारले गेले होते. परंतु या सिग्नलचा पुरता बोजावरा उडला असल्याचे चित्र शहरात आहे. बरेच सिग्नल हे बंद पडले असून काही बंद सिग्नलचा आधार घेऊन अतिक्रमणे वाढीस लागली आहे. परिणामी शहरातील प्रमुख रस्त्यावरील चौकांतील बंद पडलेले सिग्नल म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. त्यामुळे ही बंद पडलेली सिग्नल्स सुरू होऊन अनियंत्रित वाहतुकीला लगाम बसावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. या मागणीकडे पोलीस व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडत असून अपघातांच्या संख्येत वाढत होत आहे.
वाहतूक नियंत्रित करण्याच्या दृष्टीने शहरातील नगर-मनमाड, औरंगाबाद-नगर-पुणे, नगर-सोलापूर, नगर-दौंड, असे विविध महामार्ग, तसेच या महामार्गांना ठिकठिकाणी शहरातून येणारे रस्ते मिळत असल्यामुळे येथील चौकातील वाहतुकीची समस्या जटील झाली आहे. शहरामध्ये प्रेमदान चौक, पत्रकार चौक, डीएसपी चौक, जीपीओ चौक, चांदणी चौक, मार्केट यार्ड, इम्पिरियल चौक, स्वस्तिक चौक, सक्कर चौक या ठिकाणी सिग्नल बसवले आहेत. तर, पाइपलाइन रोडवर भिस्तबाग चौक व एकवीरा चौकामध्ये सिग्नल बसवण्यात आले आहेत. या सर्व सिग्नलची पाहणी केली असता, यापैकी प्रेमदान चौक, पत्रकार चौक व डीएसपी चौकातील सिग्नल वगळता इतर सिग्नल बंद होते.
अपघातांची मालिका घडलेल्या शहरातील बसस्थानकाजवळील मार्केटयाड चौक, इम्पिरियल चौक, सक्कर चौक, अहमदनगर कॉलेजजवळील कोठी चौक अशा ठिकाणी वाहतुकीची समस्या अतिशय जटील झालेली आहे. नगर-पुणे महामार्गावरील अहमदनगर महाविद्यालय परिसरातील कौठी चौक म्हणजे अनेकवेळा अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे. वास्तविक पाहता, या परिसरात सिग्नलची नितांत गरज असताना येथे कोणत्याही प्रकारचा सिग्नलची उभारणी नाही. तसेच वाहतूक नियंत्रण करणार्‍या कोणत्याही वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आलेली नाही. जवळच डॉन बॉस्को, नगर कॉलेज असल्याचे या चौकात नेहमीच वर्दळ पहायला मिळते. तसेच या चौकातून एक रस्ता कलेक्टर कचेरीच्या दिशेने जातो तसेच याच रस्त्यावरून कोठी चौकातून मार्केट यार्डाच्या दिशेने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यश पॅलेसच्या दिशेने पुण्याच्या दिशेने अवजड वाहनांची भरधाव वेगाने वाहतूक होते. या चौकात विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक जीव मुठीत धरुन रस्ता ओलांडताना दिसतात. कोठी चौकानंतर मार्केट यार्ड परिसरातील चौकात तीच परिस्थिती आहे. येथील चौकात बर्‍याच वेळा अनेक अपघात घडलेले आहेत. या भागात वाहतूक पोलिसांची नेमणूक असते. परंतु तो कधीच जागेवर नसतो. बर्‍याच वेळा तो फक्त तेथे केवळ नेमणूक म्हणून उभा असतो. वाहतूक नियंत्रणाशी त्याचे काहीही देणेघेणे नसते. परिणामी या भागात अनियंत्रित वाहतुकीचा नमुना पहायला मिळतो. मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे या भागात पहायला मिळते. त्यामुळे या भागात एखाद्या सक्षम वाहतूक पोलिसांची नेमणूक व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
शहरातील काही ठिकाणी तर सिग्नलचे खांब पडण्याच्या बेतात आले आहेत. अशा धोकादायक खांबाच्या दुरुस्तीचे काम अद्यापही सुरू झाले नाही. यामुळे मात्र चौकातील वाहतूक अनियंत्रित झाली असून अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे. प्रेमदान चौक, पत्रकार चौक येथील सिग्नल सुरू असतानादेखील काही बेशिस्त वाहनचालक भरधाव वेगात निघून जातात. चौकातून चुकीच्या पद्धतीने गाडी चालवून वाहतुकीस अडथळा करणे, असे प्रकारही या वाहनचालकांकडून सर्रास सुरू आहेत. त्यांचाही त्रास इतर वाहनचालकांना होत आहे.