Breaking News

राज्यात महायुतीचेच सरकार बनेल : नितीन गडकरी

भाजपने घेतली राज्यपालांची भेट ; मात्र सत्तास्थानेचा दावा अंधातरीच

नागपूर/मुंबई
राज्यात युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर देखील मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात युतीचे सरकार येईल, असे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी दिले.
भाजप नेत्यांनी राज्यपालांची गुरूवारी भेट घेतली, मात्र सत्तास्थापनेचा कोणताही दावा करण्यात आलेला नाही. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही सरकार स्थापन करण्यास विलंब लागत आहे. मात्र, राज्यात निर्माण झालेल्या स्थितीवर पक्ष नेतृत्व विचार करून योग्य तो निर्णय घेईल असे पाटील राज्यपालांच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी माहिती दिली. गेले 14 दिवस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून बसल्याने दोन्ही पक्षात सहमती होताना दिसत नाही. राज्यातील सरकार महायुतीचेच बनेल, मात्र, ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतली आहे. तर, भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदासह सत्तेचे समान वाटप होईल असे आश्‍वासन आपल्याला दिल्यामुळे तो शब्द पाळला गेला, तरच सरकार स्थापन करू अन्यथा आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध असल्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. दोन्ही बाजूंकडील चर्चा पूर्णपणे थांबलेली असून हा डेडलॉक कसा तोडला जाईल याकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्यात सुरू झालेला राजकीय पेच लवकरच सुटणार असून, तशी चर्चा शिवसेनेशी सुरू असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्याने, देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वात राज्यातील सरकार बनेल, असे वक्तव्य गडकरी यांनी केले आहे. महायुतीला जनादेश मिळाल्यामुळे भाजप-शिवसेना लवकरच सरकार स्थापन करतील असा विश्‍वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे. गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीबाबत गडकरी यांना प्रश्‍न विचारला असताना गडकरी म्हणाले की, ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजकारणाशी काहीही देणेघेणे नाही. त्यांचा संबंध राजकारणाशी जोडणे योग्यही नाही.’ आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार ही अफवा असल्याचेही ते म्हणाले. सध्या आपण दिल्लीत असून राज्यात येण्याचा प्रश्‍नच नाही, असेही ते म्हणाले. राज्यात भाजप-शिवसेनेला बहुमताचा कौल मिळालेला असून सत्ता स्थापनेचा निर्णय लवकरच होईल. भारतीय जनता पक्षाचे म्हणाल तर, देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. फडणवीस यांच्याच नेतृत्वात राज्यातील सरकार स्थापन होईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षाने 105 जागा जिंकल्या असून हे पाहता ज्याने जास्त जागा जिंकल्या आहेत, त्याच पक्षाचा मु्ख्यमंत्री होतो, असेही गडकरी यांनी अधोरेखित केले.