Breaking News

अयोध्येच्या निकालाकडे वेगळ्या चष्म्यातून पाहू नका : फडणवीस

मुंबई 
रामजन्मभूमीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुंबई आणि राज्यातील कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडलेला नाही. याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार मानतो, असे ते म्हणाले. अयोध्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.    
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटचा दाखला देत ते म्हणाले की, हा कोणाचा विजय किंवा पराजय नाही. हा निकाल देशाच्या अस्मितेचे प्रतिक असणारी अस्था मजबूत करणारा आहे. निकालाकडे वेगवेगळ्या चष्म्यातून पाहण्याची आवश्यकता नाही. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये उत्तम वातावरण पाहायला मिळत आहे, असे सांगत त्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. राज्यातील जनता शांतता कायम राखत येणारे सण आणि उत्सव आनंदाने साजरे करतील, असा विश्‍वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. या निकालानंतर भारतभक्तीची भावना निर्माण झाली आहे. सबका साथ सबका विकास सबका विश्‍वास या नार्‍याने देशात एकजूटीचे वातावरण असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.  
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. मात्र वडाळ्याच्या राम मंदिरात जाण्याचा निर्णय त्यांनी रद्द केला. 144 कलम म्हणजेच जमावबंदी लागू असल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वडाळ्याच्या राम मंदिरात जाण्याचा निर्णय रद्द केला. काळजीवाहू मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नियोजित वेळापत्रकानुसार दुपारी 3 वाजता वडाळा येथील राम मंदिरात पुजा आणि आरतीसाठी जाणार होते. पण जमावबंदी लागू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित होऊ नये, म्हणून त्यांनी तो कार्यक्रम रद्द केला.