Breaking News

राज्यात शॅडो कॅबिनेट आणण्याची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी

  देशाला भ्रष्टाचार व राजकीय अनागोंदीतून वाचविण्यासाठी केंद्रासह राज्यात शॅडो कॅबिनेट आणण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन व भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली आहे. तर शॅडो कॅबिनेट असतित्वात आल्यास नागरिकांच्या हक्कांची व मागण्यांची दखल घेत प्रश्‍न सुटणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी उन्नतचेतनेला तिलांजली वाहून देशात हुकमी कारभार चालवला आहे. गोवा, कर्नाटकमध्ये सत्तेचा गैरवापर करुन आमदार फोडून सत्ता स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात देखील सत्ता स्थापनेचा भाजपचा डाव शरद पवार यांच्या धोरणी राजकारणाने हाणून पाडण्यात आला. सत्ताधार्‍यांच्या हुकुमशाही पद्धतीने देशात आर्थिक मंदी व राजकीय अनागोंदी माजली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

 केंद्रामध्ये शॅडो कॅबिनेट आनल्यास हुकुमशाही पद्धतीने वागत असलेल्या सत्ताधार्‍यांवर वचक बसणार आहे. तर महाराष्ट्रात देखील भाजपने शॅडो कॅबिनेट आणून सत्ताधार्‍यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करता येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. देशात व राज्यात एक विरोधी पक्षनेता असून भागणार नाही. प्रत्येक खात्यातील मंत्रींचा शॅडो मंत्री असल्यास अनागोंदी थांबून सर्वसामान्यांना न्याय मिळणार आहे. केंद्रात खा.शरद पवार यांनी शॅडो कॅबिनेटसाठी पुढाकार घेतल्यास सत्ताधार्‍यांवर वचक निर्माण होणार असल्याची भावना अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली आहे. घरकुल वंचितांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटनेने अनेक आंदोलने करुन लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजना अंमलबजावणीची मागणी केली. मात्र सत्ताधार्‍यांनी याची दखल न घेता अद्यापि घरकुल वंचितांचा प्रश्‍न सोडविलेला नाही. महाराष्ट्रातील नवीन सरकारकडून घरकुल वंचितांना मोठ्या अपेक्षा आहे. यासाठी अण्णा हजारे यांच्या सहकार्याने केंद्रासह राज्यात शॅडो कॅबिनेट आणण्यासाठी आग्रह धरला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.