Breaking News

मल्हार चौकात पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरु

अहमदनगर/प्रतिनिधी
 कायनेटिक चौक परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्‍नावर सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनीच आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्याची महापौर बाबासाहेब वाकळे यांनी तातडीने दखल घेत पाणीपुरवठा विस्कळीत होण्यामागील कारणांचा शोध घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याने रेल्वे स्टेशन रोडवर मल्हार चौक परिसरात पाण्याच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.
या दुरुस्तीच्या कामाची महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह नगरसेवक मनोज कोतकर, राहुल कांबळे, सूरज शेळके, गणेश नन्नवरे आदींनी पाहणी केली. तसेच काम योग्य पद्धतीने करुन हा प्रश्‍न कायमस्वरुपी मिटवावा, अशा सूचना महापौर वाकळे यांनी यावेळी दिल्या. कायनेटिक चौक परिसरातील विविध कॉलन्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांनी याबाबत नगरसेवक मनोज कोतकर यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्यानंतर त्यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेऊन हा प्रश्‍न तातडीने सोडविण्याची मागणी केली होती. आठ दिवसांत प्रश्‍न मार्गी न लागल्यास महापौर कार्यालयात उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लता शेळके यांनीही या पाणीप्रश्‍नासंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या होत्या.
या प्रश्‍नाची गांभीर्याने दखल घेत महापौर वाकळे यांनी विस्कळीत पाणीपुरठ्याच्या कारणांचा तातडीने शोध घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार मल्हार चौक परिसरात पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण होताच कायनेटिक चौक परिसरात सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी सांगितले.