Breaking News

आघाडीचे सरकार टिकणार नाही : गडकरी

 राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा प्रयोग यशस्वी झाला असला, तरी ही आघाडी झाली आहे ती सिद्धातांच्या आधारांवर झालेली आघाडी नाही त्यामुळे हे सरकार स्थापन झाले तरीही फार काळ टिकणार नाही असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. शिवसेना आणि काँग्रेस हे दोन वेगळ्या विचारसरणीचे पक्ष आहेत.  भाजपा आणि शिवसेनेची युती हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झाली होती. मात्र महाराष्ट्रात आत्ता होऊ घातलेली महाविकास आघाडी ही संधीसाधू राजकारणाचे उदाहरण आहे अशीही टीका गडकरींनी केली आहे. या पक्षांमध्ये वैचारिक ताळमेळ नाही. शिवसेनेच्या विचारधारेला काँग्रेसने कायमच कडाडून विरोध केला आहे. तर काँग्रेसच्या विचारधारेला शिवसेनेने विरोध केला आहे हे आपल्याला माहित असल्याचा टोला गडकरी यांनी लगावला.

आघाडीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यांची महाविकास आघाडी देखील स्थापन झाली असून लवकरच सत्तास्थापनेची घोषणा होऊ शकते. यापार्श्‍वभूमीवर राज्यातील या राजकारणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये निवडणूकीनंतरच्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर आक्षेप घेण्यात आला आहे. राज्यातील रहिवासी असलेल्या एस. आय. सिंह या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जनमताविरोधात एकत्र आलेल्या या आघाडीचे सरकार स्थापन करण्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादीला रोखण्याचे आदेश राज्यपालांना द्यावेत अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.