Breaking News

संवैधानिक व्यवस्थेत राज्यपालांची महत्वाची भूमिका : राष्ट्रपती कोविंद

नवी दिल्ली
आपल्या संवैधानिक व्यवस्थेत राज्यपालांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. राष्ट्रपती भवनात शनिवारी राज्यपाल आणि नायब राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेला प्रारंभ झाला. यावेळी उद्घाटनपर भाषण करताना महामहिम राष्ट्रपती बोलत होते.
याप्रसंगी कोविंद म्हणाले की,विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी घटनात्मक अधिकारांचा वापर करून राज्यपाल योग्य मार्गदर्शक करू शकतात असे राष्ट्रपती म्हणाले. सर्व राज्यपालांना सार्वजनिक जीवनाचा प्रचंड अनुभव असून त्यांच्या अनुभवाचा लाभ देशातल्या जनतेला मिळायला हवा. आपण जनतेसाठी काम करतो आणि आपण त्यांना उत्तर देण्यासाठी बांधिल आहोत असे ते म्हणाले.राज्यपालांची भूमिका केवळ राज्यघटनेच्या रक्षण आणि संवर्धनापुरती मर्यादित नाही. राज्यातल्या जनतेच्या सेवा आणि कल्याणासाठी देखील ते बांधिल आहेत असे राष्ट्रपती म्हणाले. ही परिषद अधिक उपयुक्त आणि उद्दिष्टाभिमुख असावी यासाठी नवभारताच्या नव्या कार्य संस्कृतीनुसार या परिषदेची तयारी करण्यात आली आहे.
जेष्ठ राज्यपालांशी चर्चा करून राष्ट्रीय महत्वाचे पाच विषय निवडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जलस्रोतांचे संवर्धन आणि काळजीपूर्वक वापराला देशाचे सर्वोच्च प्राधान्य असून स्वच्छ भारत अभियानाप्रमाणे जलशक्ती अभियान ही आपण लोक चळवळ बनवायला हवी असे ते म्हणाले. भारताला ज्ञान क्षेत्रात जागतिक शक्ती बनवण्यासाठी आपल्या सर्व उच्च शैक्षणिक संस्थांनी संशोधन आणि शोधकतेला प्रोत्साहन द्यायला हवे असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील उद्घाटन सत्राला संबोधित केले. राष्ट्रपती भवनात होणारी ही 50वी परिषद आहे तर राष्ट्रपती कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील तिसरी परिषद आहे.