Breaking News

राजेंद्र शिंगणे यांचा राजभवनातील धक्कादायक खुलासा

मुंबई
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत असल्याचे सांगितले जात होते. मात्र राजभवनात नेमके  काय घडले? राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार जे राजभवनात उपस्थित होते ते कसे तिथे पोहोचले आणि नेमके  राजभवनात अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे या आमदारांना माहीत होते का? असे अनेक प्रश्‍न चर्चेत होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन आमदारांनी याबाबत खुलासा केला आहे.
आम्हाला अजित पवारांचा रात्री 12 वाजता फोन आला. विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर सकाळी 7 वाजता मी त्या बंगल्यावर गेलो. 15 मिनिटांनी आणखी 10 आमदार त्या बंगल्यावर जमा झाले. काही वेळाने अजितदादा त्या ठिकाणी पोहोचले. अर्धा तास थांबवल्यानंतर आम्हाला मुंबईला चर्चा करण्यासाठी जायचे आहे असे सांगण्यात आले. तिथून आम्हाला सरळ राजभवनात नेण्यात आले तिथे एका छोट्या हॉलमध्ये बसवण्यात आले. राजभवनात जाईपर्यंत आम्हाला पुसटशी कल्पनासुद्धा नव्हती की अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. किंवा आपण कुठे चाललो आहे? काय करायचे आहे? याची कोणतीही पूर्वकल्पना आम्हाला देण्यात आली नव्हती. राजभवनात बसल्यानंतरही आम्ही आपआपसात चर्चा केली. कोणालाही त्या गोष्टीचा थांगपत्ताही नव्हता. तितक्यात देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आले. त्यानंतर आम्हाला अंदाज यायला लागला. मात्र काही निर्णय घेण्याच्या आतच राज्यपाल आले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.  राजभवनात नेमके  काय घडले आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना राजभवनात कशा पद्धतीने नेण्यात आले. असा अनुभव डॉ. राजेंद्र शेंणगे यांनी सांगितला आहे. त्यांच्यासोबत संदीप क्षीरसागरही होते. त्यांनीही या संपूर्ण घटनेला दुजोरा दिला आहे. राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचा मोठा कट असल्याचं यातून समोर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांची वापसी
अजित पवार यांच्या बोलावण्यावरून राजभवनवर गेलेले काही आमदार काही तासांतच शरद पवार यांच्याकडे परत आले आहेत. कुठलीही कल्पना न देता आम्हाला राजभवनवर बोलावण्यात आले होते. मात्र, आम्ही पक्षाच्या सोबत आहोत,’ असे या आमदारांनी स्पष्ट केले आहे. भाजपच्या राजकारणामुळे धक्का बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची संयुक्त बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. त्याच वेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, बुलडाण्याचे आमदार राजेंद्र शिंगणे, सुनील शेळके यांनी आपण शरद पवारांसोबतच असल्याचे सांगितले.