Breaking News

शहर व परिसरातील रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करावी

अहमदनगर/प्रतिनिधी 
 शहर व परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली, असून त्यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांकडे केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव विनायकराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधातील मागण्यांचे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर.पिल्ले,  अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष फिरोजभाई खान, प्रदेश सदस्य श्याम वाघस्कर, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखील वारे, रुपसिंग कदम, शिवानी जरांगे, डॉ.जहिदा शेख, सरचिटणीस अभिजित कांबळे, मुकुंद लखापती, उपाध्यक्ष एम.आय.शेख, राहुल ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रिजवान शेख, राजेश बाठीया, निजाम पठाण, समीर पठाण, संजय झोडगे, महिला काँग्रेसच्या शारदा वाघमारे, मीना धाडगे, जरीना पठाण आदींचा समावेश होता.
जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालय ते जी.पी.ओ.चौक, रामचंद्र खुंट ते कोठी, टिळक रोड, लालटाकी ते दिल्लीगेट, पत्रकार चौक ते एमआयडीसी या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच होणार्‍या कामांच्या गुणवत्तेबाबत विशेष लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्यांची अवस्था देखील अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे या मार्गावरुन जाणारी वाहतूक सध्या नगर शहरातून होत आहे. त्यामुळे स्वस्तिक चौक, शिवाजी पुतळा, मार्केट यार्ड, स्टेशन रोड, चांदणी चौक येथे दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेचा व इंधनाचा मोठा अपव्यय होत आहे. याबाबत योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे देशमुख यांनी सांगितले.