Breaking News

दिल्लीत पाकिस्तान किंवा चीनने प्रदूषित वायू सोडलाय; भाजप नेत्याचा अजब दावा

नवी दिल्ली
राजधानी दिल्लीतील प्रदूषणासंदर्भात भाजपचे नेते विनीत अग्रवाल यांनी एक अजब तर्कट मांडले आहे. दिल्ली शहरात प्रदूषण नसून पाकिस्तान किंवा चीनने शहरात प्रदूषित वायू सोडल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताला घाबरणार्‍या शेजारच्या देशांनी हा प्रदूषित वायू दिल्लीत सोडल्याची शक्यता आहे. पाकिस्तान किंवा चीन यांनी हे कृत्य केले असावे, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.

प्रदूषणामुळे सामान्यांची चिंता वाढली असताना भाजपचे नेते मात्र काहीही बरळताना दिसत आहेत. दिल्ली शहरावर एअर फोर्सची विमाने वापरून पाण्याचा मारा करावा, अशी मागणी भाजपच्या एका आमदाराने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. नंद किशोर गुर्जर हे गाझियाबादच्या लोणी येथील आमदार आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिल्लीतील प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी तातडीची उपाययोजना करावी, यासाठी पत्र लिहले होते. यामध्ये त्यांनी आकाशात मेघ बीजरोपण करून दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा, असे देखील म्हटले होते.

हरयाणा व पंजाबमध्ये दरवर्षीप्रमाणेच पिकांचे अवशेष जाळण्यातूनही दिल्लीत मोठ्याप्रमाणावर वायू प्रदूषण होते. याशिवाय, दिवाळीच्या काळात दिल्लीत फटाक्यांमुळे या प्रदूषणात आणखीनच भर पडते. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वायू प्रदुषणाने कमाल मर्यादा ओलांडली आहे.

त्यामुळे लोकांसाठी श्‍वास घेणेही अवघड झाले आहे. प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने आरोग्याविषयक आणीबाणी जाहीर करण्यात आल्यानंतर सोमवारपासून दिल्लीत सम-विषम वाहनांची योजना लागू करण्यात आली. या योजनेनुसार एका दिवशी सम तर दुसर्‍या दिवशी विषम क्रमांकाच्या गाडया चालवण्याची परवानगी आहे.