Breaking News

बंड शमविण्यात पवार यशस्वी !

शरद पवार यांचे राजकारणांत जसे पाठीराखे आहेत, तसेच त्यांचे कडवे विरोधक देखील आहेत. मात्र पवार राजकारणांत काय करू शकतात. याचे ज्वलंत उदाहरण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपासून पाहत आहे. विधानसभा निवडणुकानंतर लागलेले निकाल, आणि अजित पवार यांच्या बंडानंतर त्याची झालेली परिणीती यातून महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला शरद पवार नावाची किमया कळून चुकली असेल. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात लढवय्या वृत्तीचा परिचय देणार्‍या पवारांनी दरबारी राजकारणातही आपण किती पारंगत आहोत, याची झलक दाखवली आहे. आपल्या कूटनीतीनं पुतण्या अजित पवार यांचं बंड मोडून काढतानाच एका रात्रीत सत्ता स्थापन केलेलं सरकार 80 तासांत खाली खेचून पवारांनी भाजपच्या चाणक्यांना धोबीपछाड दिली आहे. पवारांच्या या ’पावर गेम’मुळे सगळेच हैराण झाले आहेत. राज्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापनेचा गोंधळ संपुष्टात आला असून, अजित पवार यांनी पुकारलेले बंड शांत करण्यात पवार साहेब यशस्वी ठरले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सरकार कोसळले असले, तरी मुख्य चर्चा आहे, ती अजित पवार यांच्या बंडाची. अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँगे्रसकडून शेवटच्या क्षणांपर्यंत सुरू होते. अखेर यात पवार साहेबांना यश आले. विधानसभा निवडणूकीत तब्बेत साथ देत नसतांना देखील शरद पवार यांनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात प्रचारदौरे केले. आणि जी भाजप एकहाती सत्ता स्थापन करेल, आमच्यासमोर कोणताही पैलवान नाही, अशी वल्गना करत होती, त्या भाजपला पवार साहेबांनी समोर विरोधक आहे, आणि मजबूत असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर अजित पवार यांनी बंड पुकारले. अजित पवार थेट भाजपच्या गोटात सामील झाले. मात्र तरीही शरद पवार यांनी आपला संयम सोडला नाही. तसेच आपले 54 आमदार एकत्र ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र कुठेही त्यांनी आक्रस्ताळेपणा दाखविला नाही. की कुठेही भावनिक होत, पुतण्याने बंड केले, म्हणून खचूनही गेले नाहीत. शेवटच्या क्षणांपर्यंत पवार लढत राहिले. आणि अखेर त्यांनी संपूर्ण परिस्थिती शेवटच्या क्षणी आपल्याकडे ओढून आणली. त्यामुळे या दोन महिन्यात महाराष्ट्राला शरद पवार या नावांची जादू अनुभवता आली. त्याचां राजकारणांतील दुर्दम्य इच्छाशक्ती, काम करण्याची त्यांची प्रेरणा, हरत आलेला डाव शेवटच्या क्षणी जिंकण्यांची त्यांची किमया या सार्‍या गोष्टींचा महाराष्ट्राने अनुभव घेतला.  महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत तरुणांनाही लाजवेल, अशी जिगर दाखवली महाराष्ट्राचा स्ट्राँगमॅन असलेल्या शरद पवारांनी. ऐन निवडणुकीत राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवारांना नोटीस पाठवली. पण शरद पवार डगमगले नाहीत. त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा पवित्रा घेतला आणि मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांना नवी उमेद दिली. शरद पवारांचे एकेक मोहरे भाजप गळाला लावत होती. शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे भोसलेही कित्येक वेळा मनधरणी करून भाजपच्या छावणीत डेरेदाखल झाले. सातार्‍यात उदयनराजेंच्या विरोधात लढणार कोण हा कळीचा प्रश्‍न होता. तिथे शरद पवारांनी त्यांचे विश्‍वासू मित्र श्रीनिवास पाटील यांना रिंगणात उतरवले आणि उदयनराजेंचा पराभव करण्याचा चंगच बांधला. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा 80 वर्षांचा योद्धा भर पावसात मतदारांना आवाहन करत होता. शरद पवारांचा हा पावसातला फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाला. या 4 मिनिटांच्या पावसातल्या भाषणाने महाराष्ट्रात बाजी पलटली. कोणत्याही परिस्थितीत अढळ निश्‍चयी राहायचं ही शरद पवारांच्या राजकारणाची खासियत आहे. शुक्रवारी रात्री शरद पवार झोपले होते त्यावेळी अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन शपथविधीचा कट रचला. आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. मात्र शरद पवार हार मारतील, ते कसले. त्यांनी पूर्ण शांतपणे सगळी परिस्थिती समजावून घेतली. आणि संपूर्ण परिस्थिती आपल्या हातात घेतली. आणि राजकारणांच्या या पटात त्यांना शेवटच्या क्षणी यश देखील आले. अजित पवारांना परत आणण्याची शरद पवारांना काय गरज होती. पण राजकारणांसाठी कुंटुंब फुटता कामा नये, अशी त्यांची इच्छा होती. सत्ता येते, आणि जाते, मात्र कुटुंब फुटता कामा नये. ते एकत्रच असावे. आणि त्यांनी शेवटपर्यंत अजित पवारांची मनधरणी केली. त्यासाठी अनेकवेळेस जयंत पाटील, छगन भुजबख, दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. छरंतु अजित पवारांची मनधरणी करण्यात अपयश येत होते. अखेर रात्री एक वाजता, खुद्द शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार या दोघांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यांची समजत काढली. त्यामुळे अजित पवारांचे बंड शमविण्यात शरद पवार यशस्वी होतील, अशी खात्री महाराष्ट्राला वाटत होती. आणि ती शेवटी खरी ठरली.