Breaking News

पत्रकार संरक्षण कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

मुंबई
जवळपास अडीच वर्षे राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पडून असलेले पत्रकार संरक्षण कायद्याच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी अखेर 28 ऑक्टोबर रोजी स्वाक्षरी केली असून ते विधेयक आता राज्यपालांमार्फत मंत्रालयात आले आहे. त्यामुळे आता पत्रकार संरक्षण कायद्याच्या मार्गाातील सर्व अडथळे दूर झाले असून येत्या दोन-चार दिवसात यासंबंधीची अधिसूचना निघण्याची शक्यता आहे. अधिसूचना निघाल्यानंतर हा कायदा  महाराष्ट्रात लागू होईल. पत्रकार संरक्षण कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य आहे. हा कायदा व्हावा यासाठी राज्यातील पत्रकारांनी दीर्घकालिन लढा दिला होता. त्यानंतर 7 एप्रिल 2017 रोजी राज्याच्या दोन्ही सभागृहाने कोणतीही चर्चा न करता पत्रकार संरक्षण कायद्याचे विधेयक पारित केले होते. त्यानंतर स्वाक्षरीसाठी ते राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले होते. त्यावर आता स्वाक्षरी झाल्याने या विधेयकाचे रूपांतर कायद्यात झालेले आहे.