Breaking News

दहशतवाद्यांना निधी देणार्‍या कंपनीकडून भाजपला देणगी

नवी दिल्ली
दहशतवाद्यांना निधी पुरवणार्‍या कंपनीकडून भारतीय जनता पार्टीने देखील देणगी घेतल्याचे समोर आले आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या संदर्भाचा एका खटल्याचा तपास सक्तवसूली संचलनालयाकडून सुरू आहे. या तपासातूनच ही बाब समोर आली आहे.
प्रत्येक पक्षाला येणार्‍या निधीचे विवरण निवडणूक आयोगाकडे सादर करावे लागते. त्यानुसार भाजपने निवडणूक आयोगाला आयोगाला निवडणुकीच्या देणगींसंदर्भात दिलेल्या माहितीत हे उघड झाले आहे. यानुसार, 2014-15 मध्ये आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स लिमिटेडकडून 10 कोटींची देगणी घेतली आहे. भाजपला ही देणगी मुंबईमधील अ‍ॅक्सिस बँकेच्या वांद्रे शाखेच्या माध्यमातून वितरित करण्यात आली आहे. भाजपाकडून निवडणूक आयोगाला देणगींसंबंधी जी माहिती देण्यात आली आहे, त्यामध्ये देणगी देणार्‍यांच्या यादीत आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स लिमिटेडची नाव 26 व्या स्थानावर आहे. या यादीत सत्या इलेक्टोरल ट्रस्ट, प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्ट, जनता निर्वाचक इलेक्टोरल ट्रस्ट अशा अनेक नावांचा समावेश आहे.
. मिळालेल्या माहितीनुसार, रणजीत बिंद्रा इक्बाल मिर्ची आणि कंपनीमधील व्यवहारांमध्ये मध्यस्थी करण्याची भूमिका निभावत होते. भाजपाला निवडणूक देणगी देणार्‍या कंपनीवर 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिर्चीची संपत्ती खरेदी करण्याचाही आरोप आहे. ईडीचा आरोप आहे की, आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सने इक्बाल मिर्चीची संपत्ती विकण्यातही मदत केली होती. आरकेडब्ल्यू सोबत करण्यात आलेल्या व्यवहार प्रकरणी ईडीने याआधी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांची चौकशी केली आहे. आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सने दाऊद गँगशी संबंधित कंपनीसोबत करोडो रुपयांचा कथित व्यवहार केला आहे. आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सचे माजी संचालक रणजीत बिंद्रा यांना ईडीकडून अंडरवर्ल्डशी व्यवहार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. बिंद्रा यांच्यावर दहशतवाद्यांना फंडिंग केल्याचाही आरोप आहे.