Breaking News

जाणत्या खेळीने छञपतींचा मावळा मुख्यमंञी!

गेल्या चार पाच दिवसात महाराष्ट्रात घडलेल्या सत्ता नाट्याचे कुठल्याही अंगाने विचार केला तरी शरद पवार हेच लेखक आणि दिग्दर्शक आहेत.हे शरद पवारांच्या टिकाकारांनही मान्य करावे लागेल.टिकाकार भलेही  त्या दिग्दर्शनाला विश्‍वासघाताचे संबोधन देवोत पण शरद पवारांच्या खेळीने त्यांचा राजकीय शञू माञ पुरता घायाळ झाला आणि छञपतींच्या महाराष्ट्रात सच्चा मावळा मुख्यमंञी झाला हे वास्तव कुणालाही नाकारता  येणार नाही.अभिमन्यू बनण्याचे धाडस करणार्‍या राजकीय चातुर्याला नामोहरम करण्यासाठी  पवार खेळीच्या मदतीला धावला तो चतुरांचा अहंकार आणि सोबतीला असलेला फाजील आत्मविश्‍वास.

शनिवारच्या भल्या सकाळी महाराष्ट्र डोळे चोळीत असताना एक ब्रेकींग येऊन धडकली.राजभवनावर भाजप राष्ट्रावादीच्या सरकारचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंञी अजित पवार यांनी शपथ घेतली.या  ब्रेकींगने झोपेतून उठू पाहणारा महाराष्ट्र खडबडून जागा झाला.अनेकांचे मनसुबे ब्रेक झाले तर पवार कुटूंबासह राष्ट्रवादीवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढू लागले.काय झाले याचा कुणालाच थांगपत्ता  लागत नव्हता.महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खेळी करून पुन्हा येईन चा घोषा लावणार्‍या देवेंद्र फडणवीसी रणनितीला दिल्लीच्या चाणक्याने हातभार लावला म्हणून कमळवर्षाव सुरू झाला.दिल्लीश्‍वरी डावपेचांचे क ौतूक करताकरता भाजपेयी हरकून गेले.महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात असलेल्या वसंतस्मृतीत विजयाचे नगारे वाजू लागले.लाडू पेढे वाटून गुलालाची उधळण झालीआणि प्रसार माध्यमांवर मी पुन्हा आलोच!ची रटाळ  ब्रेकींग रिपीट होऊ लागली.
इकडे महाविकास आघाडीचा जन्माआधीच गर्भपात झाल्याची निराशाजनक भावना पसरू लागली.मातोश्रीचे स्वप्न भंगले.संजय राऊत नावाच्या माणसाने वाटोळे केले.पवार कुटूंबासह राष्ट्रावादी दुभंगली.एव्हढा सारा  अनर्थ अजित पवारांनी केला म्हणून बोटे मोडली जाऊ लागली.सोबत शरद पवार यांच्याकडेही विश्‍वासघातकी नजरेने पाहीले जाऊ लागले.महाराष्ट्राच्या प्रत्येक आघाडीवर एक अनामिक अज्ञात अस्वस्थता  पसरली.स्थितप्रज्ञता होती ती फक्त सिल्व्हर ओकवर.जणूकाही झालेच नाही एव्हढ्या सहजपणे ही ब्रेकींग पचविण्याचा कार्यक्रम सिल्व्हर ओकवर सुरू झाला.आणि इथेच पुन्हा एकदा अविश्‍वासाची भावना सिल्व्हर  ओकच्या भवताली पिंगा घालू लागली.माञ अशा परिस्थितीला सामोरे जाताना संयंम ढळू द्यायचा नसतो असे असंख्य वस्तुपाठ शरद पवार यांनी महाराष्ट्राला नव्हे देशाला घालून दिले आहेत.तासाभरात परिस्थिती  आपल्या नियंञणात आणून शरद पवार यांनी सर्वप्रथम निर्माण होऊ लागलेला संशय दुर केला.दिल्लीची चाणक्यनिती जिथे थांबली तिथून शरद पवारांची रणनिती सुरू झाली.
गेल्या चार सहा महिन्यातील शरद पवार यांच्या राजकीय चाली पाहील्यानंतर विशेषतः लोकसभा निवडणूकीपासून शरद पवार यांच्या खेळी लक्षात घेतल्यानंतर महाराष्ट्रात आज निर्माण झालेल्या राजकीय  वातावरणाची कल्पना सहज येते.भारताच्या राजकारणात सक्रीय असलेल्या बुजुर्ग पिढीत एकमेव शरद पवार क्रियाशील दिसताता,त्यांच्या पिढीतील प्रत्येकाने जवळपास मान टाकली आहे.कुणी वृध्दावस्थेने बेजार  झाला आहे तर कुणी भाजपाच्या कुटनितीसमोर हतबल ठरून बेजार झाला आहे.शरद पवार हेच एकमेव पुरून उरले आहेत.महाराष्ट्राच्या मातीचा तो गुण असेल कदाचित पण छञपतींच्या महाराष्ट्रात रूजलेल्या फुले  शाहु आंबेडकरांच्या विचाराने पेशवाईला पुन्हा एकदा धोबीघाट दाखवला.
हे सारे घडत असतांना महाराष्ट्राच्या राजकारणातील विद्वान अभ्यासक वेगवेगळ्या प्रतिक्रीया देत आहेत.कुणाला शरद पवारांची रणनिती वाटते.कुणाला अजित पवारांचे बंड फसल्याचा वास येतो आहे.शरद पवारांना कु णी विश्‍वासघातकी म्हणतो आहे तर कुणी काका पुतण्यातील संघर्ष म्हणत आहे.कन्या आणि नातावाच्या प्रेमाने पुतण्यावर अन्याय केला असे तारेही तोडले जात आहेत.प्रत्येकजण आपल्या कुवतीप्रमाणे अंदाज बांधू  लागला आहे.निष्कर्ष काहीही निघत अषाला तरी त्या निष्कर्षाला शरद पवार हेच कारणीभूत आहे हे नाकारता येणार नाही.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यशैलीने अवघ्या भारतात सुप्त असंतोष पसरला आहे याची जाणीव शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या राजकारण्याला आहे.महाराष्ट्रातही सर्वसामान्य माणूस फडणवीसांच्या कार्यशैलीवर  समाधानी नाही.शेतकर्‍यांपासून  व्यापार्‍यापर्यंत सर्वच घटकांमध्ये तिव्र नाराजी असल्याचे ते जाणून होते.लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत शरद पवार यांना व्यक्तीगत पातळीवर लक्ष्य करण्याचा  भाजपाने प्रत्येक आघाडीवर प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस फोडली.एव्हढा द्रविडी प्राणायाम करूनही शरद पवारांसारखा योध्दा निवृत्तीच्या वयातही खचत नाही हे लक्षात आल्यानंतर इडीला मैदानात उतरवले.आणि  इथेच भाजपाची उलटी गणती सुरू झाली.महाराष्ट्राची सहानुभूती पवार नावाभोवती एकवटली.शरद पवार यांना आपला हेतू साध्य करण्यासाठी नियतीने वातावरण निर्मिती गेली.अजित पवारांचे तत्कालीन राजीनामा  नाट्यही शरद पवारांना आणखी सहानुभूती मिळण्यास कारणीभूत ठरले.ऐंशीकडे झुकलेले शरद पवार पंचविशीतील तरूणाप्रमाणे उन वारा पावसाची तमा न बाळगता शेतकर्‍यांचे अश्रू पुसणारे शरद पवार महाराष्ट्राला  भावले.
विधानसभा निकालानंतर निर्माण झालेली ञिशंकू राजकीय परिस्थिती या सर्व वातावरणाला पोषक ठरली.तिचा फायदा शरद पवारांसारखा जाणता घेणार नाही तरच नवल,संजय राऊत यांना हाताशी धरून भाजपा विरोधी वातावरणाला धुनी देण्याची रणनाती अंतिम टप्यात असताना अजित पवार अंक अचानक राजकीय रंगमंचावर अवतारला.आणि सगळे संपले असे वाटत असतानाच जाणत्याची खेळी सुरू झाली.अजित  पवारांच्या या नाट्यामागे शरद पवार आहेत की नाही यावर एकमत होणे अशक्य आहे.पतंगबाजीतून ठोस निष्कर्ष निघणार नाही.हे खरे असले तरी पुतण्याच्या या भुमिकेची निर्मिती माञ शरद पवार यांनीच केली किं बहूना ती परिस्थिती निर्माण केली हे माञ मान्य करावेच लागेल.महाविकास आघाडीच्या निर्मितीसाठी स्वीकारालेले वेळ काढू धोरण आणि उध्दव ठाकरे यांच्या नावाचा अट्टाहास यामुळे अजित पवार नाराज आणि  उद्विग्न झाले म्हणून त्यांनी भाजपाला पाठींबा दिला.ही अनेकांनी व्यक्त केलेली प्रतिक्रीया बरेच काही सांगून जाते.त्याच ही परिस्थिती शरद पवार यांनी निर्माण केली होती हे प्रतिक्रीया देतांना विसरले जाते.शरद पवार  यांना जे साध्य  करायचे होते किंवा आहे त्यासाठी आवश्यक असलेल्या रणनितीचा तो एक भाग आहे.
अजित पवार यांच्या या भुमिकेशी शरद पवार हे सहमत होते की नाही यापेक्षा  जे हव होतं ते शरद पवारांनी मिळवलं हे अधिक महत्वाचे आहे.काय हव होतं शरद पवारांना? तर भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी  घटनेचा मुडदा पाडू शकतो हे देशाला निदर्शनास आणून द्यायचे होते.एका राञीत असंवैधानिक मार्गाने राष्ट्रापती राजवट उठवून भाजपा महाराष्ट्राशी धोका करून सरकार स्थापन करू शकते हे दाखवून द्यायचे  होते.एरावी विरोधकांनी दावा केला असता तर इतक्या सहजासहजी राष्ट्रपती राजवट उठवली गेली नसती,याशिवाय बाळासाहेब ठाकरे यांचेशी असलेली मैञी आणि त्या मैञीतून बाळासाहेबांची वेळोवेळी झालेली मदत  सव्याज परत करायची होती.त्यासाठी यापेक्षा चांगली वेळ नव्हती.शिवसेनेसमोर छञपतींचा आदर्श आहे.उध्दव ठाकरे हे स्वतःला छञपतींचा मावळा म्हणतात.आणि म्हणून या जाणत्या खेळीने उध्दव ठाकरे यांच्या  माध्यमातून महाराष्ट्राला  छञपतींचा कट्टर मावळा मुख्यमंञी दिला आहे,सोबत नातवासह कन्येच्या राजकीय भविष्याची गुंतवणूक केली आहे.खा.सुप्रिया सुळे आणि आ.रोहीत पवार भविष्यात जेंव्हा जेंव्हा राजकीय  अडचणीत येतील त्या प्रत्येक वेळी आजचा हा क्षण समोर ठेवून मातोश्री मदतीला धावली तर महाराष्ट्राला आश्‍चर्य वाटणार नाही.