Breaking News

शाळांबाहेरील कोंडी फुटणार?

ठाणे पोलीस आणि शाळा प्रशासनाची लवकरच होणार बैठक; वाहने उभी करण्यासाठी आराखडा तयार करणार

ठाणे
ठाणे शहरातील विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात होणार्‍या वाहतूक कोंडीच्या त्रासाचा सामना करावा लागू नये यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ठाणे वाहतूक पोलीस लवकरच शाळा प्रशासनासोबत एकत्रित बैठक घेऊन कोंडी सोडविण्याबाबत अंतिम तोडगा काढणार आहेत. त्यामध्ये शालेय बसचालकांनी आणि पालकांनी कोणत्या भागात वाहने उभी करावी, याचा आराखडाही तयार केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहरातील शाळांबाहेर सकाळी, दुपारी, संध्याकाळी विद्यार्थ्यांना नेणारी वाहने, शाळा बस, पालकांची वाहने यांची मोठी गर्दी होते. अनेक शाळांच्या परिसरातील रस्ते अरुंद असल्याने या वाहनांचा ताण तेथील नियमित वाहतुकीवर पडून वाहतूक कोंडी होते. या कोंडीचा परिणाम जोडरस्त्यांवरही दिसून येतो. तसेच या कोंडीचा त्रास विद्यार्थ्यांनाही होतो.
या पार्श्‍वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी आता शाळेच्या परिसरातील कोंडी सोडविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेसाठी ठाणे वाहतूक पोलीस लवकरच शाळा प्रशासनासोबत एकत्रित बैठक घेणार आहे. त्यामध्ये शाळा प्रशासनासोबत चर्चा करून शालेय वाहने आणि पालकांची वाहने कुठे उभी करावीत, याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखडयाचे काटेकोट पालन करण्यासाठी शाळेचे दोन कर्मचारी परिसरात तैनात केले जाणार असून ते आराखडयाप्रमाणेच वाहने उभी करण्याच्या सूचना बसचालकांसह पालकांना करणार आहेत. तसेच सूचना देऊनही शाळाच्या परिसरात वाहने उभी केली तर त्या वाहनमालकांवर कारवाई करण्याची योजनाही पोलिसांकडून आखली जात आहे, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

शाळा परिसरातील कोंडी सोडविण्यासाठी लवकरच शाळा प्रशासनासोबत एकत्रित बैठक बोलविण्यात येणार असून त्यामध्ये शाळाबाहेरील कोंडी सोडविण्यासाठी शाळा प्रशासनाला काही सूचना केल्या जाणार आहेत. तसेच शाळा परिसरात बेकायदा वाहने उभी केल्याचे आढळून आले तर त्या वाहनमालकांवर कारवाई करण्यात येईल. 
अमित काळे, उपायुक्त- ठाणे वाहतूक पोलीस