Breaking News

आर्थिक विकासाचा वेग मंदावला पण, मंदीचा स्थिती नाही : निर्मला सीतारामन

नवी दिल्ली
देशातील आर्थिक मंदी सदृष्य परिस्थितीबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाचे भाष्य केलेय. देशात आर्थिक विकासाचा वेग मंदावला आहे. परंतु, मंदीची स्थिती नसल्याचे प्रतिपादन सीतारामन यांनी बुधवारी राज्यसभेत केले. तसेच देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
विरोधकांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्दावरुन संसदेत हल्लाबोल केला. देश मोठया संकटाच्या दिशेने चाललेला असून रोजचे खर्च भागवण्यासाठीही लोकांकडे पैसे नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. यापार्श्‍वभूमीवर देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत बोलत असताना सीतारामन यांनी मोदी सरकारच्या पहिल्या टर्मची काँग्रेसप्रणीत संपुआ दोनच्या 2009 ते 2014 मधील कारभाराबराशी तुलना केली. मोदी सरकारच्या कार्यकाळात महागाई कमी आणि विकासाचा वेग जास्त असल्याचा सीतारमन यांनी दावा केला. अर्थमंत्री म्हणाल्या की, 2009-14 या काळात देशात 189.5 अब्ज डॉलर्सची परदेशी गुंतवणूक आली होती. तर भाजपाच्या पहिल्या शासन काळात 283.9 अब्ज डॉलर्सची परदेशी गुंतवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. सीतारमन यांनी राज्यसभेत ही तुलनात्मक आकडेवारी मांडल्यानंतर संतापलेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.