Breaking News

मखदूम सोसायटीतर्फे दुर्मिळ नाणी प्रदर्शन

अहमदनगर/प्रतिनिधी 
“शिक्षण घेत असताना विद्यार्थी आपल्या शिक्षकांकडून इतिहासाबद्दल बर्‍याच गोष्टी ऐकत असतात. तसेच त्या काळातील दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्‍या नाणी, तसेच सनदी, वस्तू, त्या काळातील बोलल्या जाणार्‍या वेगळ्या भाषा व त्यातील व्यवहार अशा अनेक बाबींबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जाणून घेण्याची उत्सुकता असते. जेव्हा या सर्व दुर्मिळ वस्तू स्वत:च्या डोळ्यांनी बघण्याचा योग येतो तर मुलांच्या उत्साह व आनंदाला सीमा नसते’’, असे प्रतिपादन दुर्मिळ वस्तूचे संग्राहक इंजिनिअर सचिन डागा यांनी केले.
मखदूम सोसायटीच्या वतीने भारतरत्न मौलाना आजाद यांच्या जयंतीनिमित्त कौमी एकता सप्ताहाचा समारोप  मुकुंदनगर येथील मौलाना आजाद हायस्कूलमध्ये दुर्मिळ नाणी, नोटा, पोस्टल तिकीट व नवीन चलनातील नाणी व नोटांच्या प्रदर्शनाने करण्यात आला. हे प्रदर्शन जीवन फाउंडेशन व शाह ऑप्टीकलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून जीवन फाऊंडेशनचे अध्यक्ष सय्यद आरिफ, शाह ऑप्टीकलचे संचालक तन्वीर चष्मावाला, कवियत्री डॉ.कमर सुरुर, मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह अब्दूस सलाम सर, ऋषीज् इंग्लिश अ‍ॅकॅडमीचे संचालक प्रा. श्रीकांत सोनटक्के, गड-किल्ले अभ्यासक ठाकूरदास परदेशी, इकबाल सय्यद, माजी मुख्याध्यापक शरफुद्दीन शेख आदी उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनास मुकुंदनगरमधील सर्व शाळांच्या तसेच भिंगार, आलमगीर व शहरातील काही शाळांच्या सुमारे 3500 विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने प्रदर्शनास भेट दिली. दोन दिवस मोफत प्रदर्शन लावल्याबद्दल सचिन डागा यांचा मखदूम सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रदर्शनात भारतीय संस्थानिक राजांचे स्टॅम्प पेपर, कोर्ट फी स्टॅम्प, स्वतंत्र भारतातील चलनी नाणी, स्मारके शिक्के, ब्रिटीशकालीन सिक्के मुगल राजांची नाणी, काश्मिरी राजांची नाणी, छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी, अहमदनगर शहराच्या राजांची नाणी, खोटी नाणी, तांत्रिक चुकीची नाणी, ब्रिटीशकालीन नोटा, संस्थानिक राजांच्या नोटा, पोर्तुगीज  नोटा, हैद्राबाद निजामाच्या नोटा, खादी हुंडी नोटस्, स्वतंत्र भारतातील जुने व नवीन चलनातील एक ते दोन हजारपर्यंतच्या नोटा, बगीनर स्टॅम्प संग्रह, पोस्टल स्टॅम्प संग्रह, सीट लेटस्, मिनिएचर शिटस् आदी ठेवण्यात आली होती. मुकुंदनगर भागात प्रथमच असे अनोखे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल पालक व या भागातील शाळेच्या शिक्षकांनी मखदूम सोसायटीचे आभार मानले व पदाधिकार्‍यांचा सन्मानही केला.