Breaking News

राज्यात सत्तासंघर्षाचा ‘हायव्होल्टेज’ ड्रामा

भाजप-राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाचे नवे सरकार

मुंबई
राज्यातील सत्ता स्थापनेच्या संघर्षात हायव्होल्टेज ड्रामा शनिवारी बघायला मिळाला. राष्ट्रवादी काँगे्रसचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी बंड करत भाजपला पाठिंबा दिल्यामुळे  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या शपथविधीसाठी हजर असलेले आठ आमदार राष्ट्रवादी काँगे्रसच्या बैठकीला हजर झाल्यामुळे अजित पवारांचे बंड औटघटकेचे ठरते की काय. अशी शंका आता उपस्थित करण्यात येत आहे. अजित पवार यांना महत्वपूर्ण साथ देणारे धनजंय मुंडे नॉट रिचेबल होते. मात्र मुंडे देखील राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर झाल्यामुळे अजित पवार काहीसे एकाकी पडल्याचे दिसून येत होते.
राज्यातील सत्ता स्थापनेच्या नाटयांनी शनिवारी घेतलेल्या वेगळया वळणांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. राष्ट्रवादी काँगे्रसच्या 54 आमदारांपैकी 50 आमदार बैठकीत असल्यामुळे अजित पवारांसोबत केवळ तीन आमदार असल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातील जनतेला कोणतीही अपेक्षा नसतांना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या राजकीय नाटयामूळे राज्यात हायहोल्टेज राजकीय ड्रामा बघायला मिळाला. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्यासह सुनील भुसारा, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ, राजेंद्र शिंगणे, संदीप क्षीरसागर, दिलीप बनकर, सुनील शेळके यांच्यासह आठ आमदारांनी आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना न देता राजभवनांवर नेण्यात आले होते. मात्र त्यानंतर यातील अनेक आमदार राष्ट्रवादी काँगे्रसच्या बैठकीला परत आले आहेत. आठ आमदार पुन्हा बैठकीसाठी हजर झाले असून, आपण शरद पवार आणि राष्ट्रवादीसोबत असल्याचे या आमदारांनी म्हटले आहे.
राज्याच्या राजकारणाला मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच भाजपकडून राज्यात सरकार स्थापन करण्यात आले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हटवण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर मुंबईत सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या नव्या अनपेक्षित समीकरणामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा असतानाच एका रात्रीत राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आज सकाळी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल  भगतसिंग कोश्यारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे तिन्ही पक्षांचे सरकार स्थापन करण्याच्या चर्चा सुरु असतानाच आज काल रात्रीत संपूर्ण राजकारण पालटून गेले. तसेच राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यतंची मुदत दिली आहे. दरम्यान, भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन केल्याने शिवसेनेला मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मला पुन्हा एकदा राज्याची सेवा करण्याची संधी दिली. राज्याच्या जनादेशाला नाकारात शिवसेनेने दुस-या पक्षाशी आघाडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आम्ही लवकरच विधीमंडळात बहुमत सिद्ध करू असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज्यातील राजकारणाला आज नवे वळण आले. गेल्या महिनाभरापासून राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा काही सुटत नव्हता. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत होते. अशाच आज मोठी राजकीय घडामोड घडली. भाजप आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाने सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, अजित पवार यांनी राज्यपालांना राष्ट्रवादीच्या आमदारांच्या समर्थनाचे पत्र देखील दिले आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. अजित पवारांनी आमदारांच्या सह्यांच्या पत्राचा गैरवापर केला असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.पक्षात आणि कुटुंबात फूट : सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटूंब यांच्यात फूट पडली असल्याचे पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. आपल्या मोबाईलवरील व्हॉटसऍप स्टेटसमध्ये त्यांनी हे वाक्य लिहिले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर माध्यमांशी बोलताना त्या भावूक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रूही आले. दुसर्‍या एका स्टेटसमध्ये त्यांनी आयुष्यात कोणावर विश्‍वास ठेवायचा, ज्याच्यावर मनापासून प्रेम केले त्याच्याकडूनच फसवणूक झाली, असेही म्हटले आहे.  सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केल्याची चर्चा होती. पण त्यानंतर लगेचच शरद पवार यांनी ट्विट करून हा अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगितले.


भाजप बहुमत सिद्ध करू शकणार नाही : पवार
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून सरकार स्थापनेचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही. 30 नोव्हेंबरला पुढचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तिन्ही पक्ष पुन्हा एकदा सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. भाजपच्या या राजकारणामुळे धक्का बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची संयुक्त बैठक मुंबईत झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. अजित पवार सकाळी सकाळी राजभवनात गेले आहेत, असे मला सहा वाजता कळले. महाराष्ट्राच्या राजभवनाची कार्यक्षमता अचानक इतकी वाढल्याबद्दल मला आनंद झाला. मात्र, नंतर सगळ्या घडामोडींचा उलगडा झाला. अजित पवार असे काही करतील हे मलाही वाटले नव्हते. भाजपसोबत जाण्याचा त्यांचा निर्णय राष्ट्रवादीच्या धोरणाविरोधात आहे. हा एक प्रकारचा शिस्तभंग आहे. राष्ट्रवादीचा कुठलाही प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाण्याची भूमिका घेणार नाही. महाराष्ट्राचे जनमानस भाजपच्या विरोधात आहे. याची दखल न घेता कुणी निर्णय घेत असेल तर सर्वसामान्य जनता त्यांना पाठिंबा देणार नाही, असे पवार यांनी यावेळी सांगितले.
या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, ते पुढे म्हणाले, जनादेशाचा अनादर केल्याचा आमच्यावर आरोप केला जात होता. त्यांनी जे केले तो जनादेशाचा आदर असतो. ही रात्रीस खेळ चाले नावाची टीव्ही मालिका नाही. तुम्ही माणसे फोडण्याचे काम करता. आम्ही ते सर्वांसमोर बोलून करतो. बिहार, हरियाणामध्ये जे झाले ते महाराष्ट्रात झाले. आमची लढाई ही भाजपच्या ’मी’ पणाविरोधात सुरु आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रावर भाजपने फर्जिकल स्ट्राइक केला असून केंद्रातील नेत्यांनी जे केले त्याचा आम्ही निश्‍चित सूड घेणार असल्याचे ते म्हणाले. आम्हाला मित्र पक्ष नको, विरोधी पक्ष नको, पक्षातले मित्रही नको, असे भाजपचे धोरण आहे. मर्द मावळे हे नेहमी रणांगणात असतात. रात्रीस खेळ चालू ठेवून सत्ता मिळवता येत नसते. आम्ही कालही एकत्र होतो, आजही एकत्र आहोत आणि उद्याही एकत्र असणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.


केंद्राचा महाराष्ट्रावर ‘फर्जिकल स्ट्राईक’ : ठाकरे
राज्यातच नव्हे तर देशात लोकशाहीच्या नावाने जो खेळ चालला आहे, तो लाजीरवाणा आहे. रात्रीस खेळ चालू ठेवून त्यांनी सत्ता मिळवली आहे. केंद्रातील कॅबिनेटने पहाटे बैठक घेऊन राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवल्याचे सांगण्यात येते. केंद्राने महाराष्ट्रावर केलेला हा फर्जिकल स्ट्राईक असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.