Breaking News

आमचं ठरलंय! राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ देणार नाही; काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका

मुंबई
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ देणार नाही, ही आमची (काँग्रेस) आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे. असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी केले आहे. हुसेन दलवाई यांनी आज नुकतेच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर दलवाई यांनी भाजपचं सरकार येणार नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे या दोघांमध्ये बंद दाराआड काय चर्चा झाली, असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे.
दलवाई यांनी सांगितले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यायची नाही,
संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना हुसेन दलवाई म्हणाले की, भाजपचे सरकार बनू नये, यासाठी कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चर्चा करुन मार्ग काढायला हवा. भाजपने माहाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांची, मजूरांची, कारखान्यांची, शिक्षणाची, सामाजिक व्यवस्थेची, अर्थकारणाची वाट लावली आहे. त्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर ठेवायला हवे.
निवडणुकीचे निकाल लागले त्या दिवशी वृत्तवाहीनीशी बोलताना येत्या काळात गरज पडल्यास शिवसेनेला काँग्रेस पाठिंबा देऊ शकतं, अशी भूमिका काँग्रेस नेते हुसेन दलवाई आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली होती.
निवडणुकीच्या निकालापासून हुसेन दलवाई शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल आहेत. तीन दिवसांपूर्वी दलवाई यांनी याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये दलवाई यांनी म्हटले की, महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास काँग्रेसने त्यांना पाठिंबा द्यावा.
दलवाई यांनी पत्रात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत खूप फरक आहे. त्यांचं राजकारण आता सर्वसमावेशक झालं आहे. त्यामुळे त्यांना आपण पाठिंबा देण्यास हरकत नाही. प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना काँग्रेसने जेव्हा राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली होती, तेव्हा शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायला हवा. भाजपचं राजकारण टोकाचं आहे. मॉब लिन्चिंगबाबतच्या त्यांच्या भूमिका चुकीच्या आहेत. असेही दलवाई यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, संजय निरुपम यांच्यासह काही ज्येष्ट नेत्यांनी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, अशी भूमिका मांडली आहेत. तर हुसेन दलवाई, पृथ्वीराज चव्हाण, विश्‍वजीत कदम यांच्यासह पक्षातील तरुण नेते हे शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल आहेत.