Breaking News

भट्टीवाडी शाळेत फुलपाखरांचे छायाचित्र प्रदर्शन

 अहमदनगर/प्रतिनिधी
 पाथर्डी तालुक्यातील करंजी जवळील डोंगराच्या कुशीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या भट्टीवाडी शाळेत एकदिवसीय निसर्ग अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. नगर येथील छायाचिञकार संजय दळवी यांनी करंजी घाट परिसरात चित्रित केलेल्या फुलपाखरांच्या मनमोहक छायाचिञांच्या प्रदर्शनाने झाली. विद्यार्थ्यांमध्ये चिकीत्सक व संशोधकवृत्तीत वाढ व्हावी व त्यांच्यात निसर्गप्रेम रुजावे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
 प्रदर्शनाचे उद्घाटन तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ यांनी केले. प्रमुख मान्यवर म्हणून संजय दळवी, नितीन चिंचोरकर, केंद्रप्रमुख राहुल अकोलकर, संदिप मचे, छानराज क्षेञे, नवनाथ आरोळे, अमोल आगाशे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. चार भिंतीच्या आतील शिक्षणाला अशा उपक्रमांची जोड मिळाल्याने आनंदाची झालर लाभते. असे मत गटशिक्षणाधिकारी वाव्हळ व दळवी यांनी यावेळी व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
 प्रदर्शनानंतर आयोजित निसर्गअभ्यास सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी वाडीच्या डोंगराळ भागातील विविध प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी देवुन माहिती मिळवली. यामध्ये पर्जन्यमापकाद्वारे पर्जन्याच्या प्रमाणाची नोंद कशी घेतली जाते याचे प्रात्यक्षिकही अनुभवले. सोशल सेंटरचे शांतवन क्षेञे यांनी औषधी व फळझाडांच्या रोपवाटिकेत विविध वनस्पतींची ओळख व त्यांचे उपयोग,सहयोगी वृक्षलागवड व जलसंधारण उपक्रमातुन पाणीदार केलेल्या विविध प्रकल्पांची माहिती प्रत्यक्षरित्या दिली.या उपक्रमाचे नियोजन शिक्षक जयराम सातपुते, परमेश्वर भवर व सचिन अकोलकर यांनी केले होते.